दिवाळीच्या खरेदीसाठी सध्या बाजारपेठा ओसंडून वाहत आहेत. अशातच अनेक रस्त्यांवर आणि पुलांवरही केल्या जाणाऱ्या दुहेरी किंवा तिहेरी पार्किंगमुळे रस्त्यांवरून चालायचे कसे, असा प्रश्न पादचाऱ्यांना पडतो आहे. शहरभरातील या बेशिस्त पार्किंगमुळे जागोजागी वाहतूक कोंडीही होत आहे. विशेष म्हणजे शहराच्या मुख्य भागाबरोबरच उपनगरांमध्येही पार्किंगची अशीच परिस्थिती दिसत आहे.

शहरातील अनेक रस्त्यांवर सध्या दुहेरी किंवा अगदी तिहेरी रांगेत वाहने उभी केलेली सर्रास दिसून येतात. पदपथांना लागून किंवा वेळप्रसंगी पदपथांवर उभ्या केलेल्या दुचाकी, त्याच्या बाहेर चारचाकी वाहनांची रांग आणि त्याच्या बाहेर वाहने उभी करून आतमध्येच बसलेले चालक असे दृश्य दिसून येते. बहुतेक ठिकाणी रस्त्याच्या एका बाजूचा अर्धा भाग या अनधिकृतपणे उभ्या केलेल्या वाहनांनी व्यापलेला असतो. वर्षभर फिरत्या विक्रेत्यांनी पदपथ अडवलेलेच असतात. त्यामुळे मुळातच शहरातील विविध रस्त्यांवरून चालताना पादचाऱ्यांना कसरतच करावी लागते. त्यातच सध्या रस्त्यावरच आकाश कंदील, पणत्या, रांगोळी, फटाके आणि दिवाळीसाठी लागणाऱ्या विविध वस्तू विकणाऱ्या विक्रेत्यांनी ठाण मांडले आहे. त्यामुळे पदपथ, गल्ल्या चालण्यासाठी नाहीत, अशीच परिस्थिती आहे. पदपथांच्या बाहेरच्या बाजूला रस्त्यावर हातगाडय़ा आणि उभी केलेली वाहने, त्याबाहेर गाडीत बसूनच खरेदी करणारे किंवा वाहन उभे करण्यासाठी जागा मिळत नाही म्हणून रस्त्यावर वाहन उभे करून त्याची राखण करत बसणारे चालक यांनी रस्ते अडवलेले असतात. त्यामुळे वाहनांच्या या दोन रांगा ओलांडून रस्त्याच्या मध्यातून चालण्याची वेळ पादचाऱ्यांवर येत आहे.

उपनगरांमध्येही पार्किंगचा प्रश्न

शहरातील मुख्य बाजारपेठेचा भाग असलेला लक्ष्मी रस्ता, कुमठेकर रस्ता, बाजीराव रस्ता, अप्पा बळवंत चौक, शिवाजी रस्ता, टिळक रस्ता या ठिकाणी दुहेरी रांगामध्ये वाहने उभी करण्यात येत नसली, तरी वाहन उभे करायला जागाच मिळत नसल्यामुळे रस्त्यातच दुचाकी किंवा चारचाकी वाहने थांबवून खरेदी चालते. शास्त्री रस्ता, जंगली महाराज रस्ता, फग्र्युसन रस्ता, कर्वे रस्ता, पौड रस्ता, सिंहगड रस्ता, त्याच्या लगतचा डीपी रस्ता, पुणे स्टेशन परिसरातील भाग या ठिकाणी अनधिकृतपणे वाहने उभी केलेली दिसून येतात. हा मुख्य बाजारपेठेचा भाग नसला, तरीही उपनगरांमधील स्वतंत्र बाजारपेठा, हातगाडय़ा, फिरते विक्रेते यांपासून मॉल्स, ब्रँडेड वस्तूंची दुकाने, विद्युत उपकरणांची, फर्निचरची दुकाने या रस्त्यांवर अधिक आहेत. अनेक मोठय़ा दुकानांचेही स्वत:चे वाहनतळ नाही. त्याचप्रमाणे महापालिकेकडून ‘पे अँड पार्क’ची सुविधा आणि वाहनतळ सुविधा या भागांत मोजक्याच प्रमाणात आहे. त्यामुळे या भागांतही पार्किंगचा प्रश्न गंभीर झाला आहे. कुंभारवाडा, जुनाबाजार परिसरातही भर रस्त्यांवर उभी करण्यात येणारी वाहने वाहतूक कोंडीला आमंत्रण देत आहेत.