‘चित्रपटांमुळे अनेक आजारांविषयी नकारात्मक भावना (स्टिग्मा) निर्माण झाला आहे. ‘काटय़ाने काटा काढणे’ या उक्तीनुसार हा स्टिग्मा कमी करण्यासाठी आपल्याला चांगले चित्रपट बनवावे लागतील,’ असे मत ज्येष्ठ अभिनेते डॉ. मोहन आगाशे यांनी व्यक्त केले.
‘कोअर इंडिया इन्स्टिटय़ूट ऑफ लीगल मेडिसिन’ आणि ‘इंडियन मेडिकल असोसिएशन’ यांच्यातर्फे आयोजित करण्यात आलेल्या ‘डॉक्टर-पेशंट सिनर्जी’ या दोन दिवसांच्या न्यायवैद्यक परिषदेचा रविवारी समारोप झाला. या वेळी डॉ. आगाशे बोलत होते. मुंबई उच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायाधीश न्या. मोहित शहा, राष्ट्रीय ग्राहक तक्रार निवारण आयोगाचे सदस्य डॉ. एस. एम. कंटीकर, राज्य मानवाधिकार आयोगाचे अध्यक्ष एस. आर. बान्नुरमठ, प्रसिद्ध शल्यविशारद डॉ. व्ही. एन. श्रीखंडे, उद्योजक प्रतापराव पवार, ‘कोअर इंडिया’ संस्थेचे संस्थापक डॉ. संतोष काकडे, आयएमएच्या पुणे शाखेचे अध्यक्ष डॉ. अविनाश भुतकर, डॉ. अविनाश भोंडवे या वेळी उपस्थित होते.
डॉ. आगाशे म्हणाले,‘मेंदूची मूळची कार्ये आपण आता मोबाईलसारख्या उपकरणांकडून ‘आऊटसोर्स’ करुन घेतो. तसेच डॉक्टर रुग्णाकडे न पाहता केवळ चाचण्यांचे अहवाल पाहतात अशी हल्ली रुग्णांची तक्रार असते. चित्रपट हे शिकवणारे माध्यम आहे. चित्रपटांमुळे अनेक आजारांविषयी ‘स्टिग्मा’ तयार झाला आणि तो कमी करण्यासाठी आपल्याला चांगले चित्रपट बनवावे लागतील. ‘अनुराधा’ सारखे काही चित्रपट सोडता डॉक्टर व रुग्ण यांच्यातील विश्वासाचे नाते दाखवणारे चित्रपट कमी आले. सुमित्रा भावे व सुनील सुकथनकर या दिग्दर्शकांनी ‘देवराई’, ‘बाधा’, ‘अस्तू’ असे चांगले चित्रपट दिले. अशा संवेदनक्षम व्यक्तींची आज आवश्यकता आहे.’’
अमेरिकेतील न्यायवैद्यक व्यवस्था उत्तम असून आपल्याकडेही त्या प्रकारचे बदल गरजेचे असल्याचे न्या. शहा यांनी सांगितले.
बान्नूरमठ म्हणाले,‘डॉक्टरांचा वेळ महत्त्वाचा आहे. परंतु म्हणून डॉक्टरांकडून रुग्णाला अपेक्षित असणारा विश्वासाचा स्पर्श हरवून चालणार नाही.’

‘वैद्यकीय क्षेत्रातील गैरप्रकार थांबायला हवेत’

परिषदेच्या सकाळच्या सत्रात सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती एम. बी. शहा उपस्थित होते. ते म्हणाले,‘दैनंदिन जीवनात आपण सर्व ग्राहक आहोत. डॉक्टरांनीही उपचार करताना त्याचे भान ठेवायला हवे. मोठय़ा दवाखान्यांमध्ये अनेकदा पैशांसाठी रुग्णांची अडवणूक होते, अपघातग्रस्त रुग्णांना तत्पर सेवा मिळणे गरजेचे असूनही अनेकदा डॉक्टर त्याकडे कानाडोळा करतात. व्यावसायिकता व ‘मालप्रॅक्टिस’चा शिरकाव झाल्यामुळे वैद्यकीय क्षेत्र बदनाम होत असून हे गैरप्रकार थांबवणे गरजेचे आहे.’