मणक्याच्या विकारामुळे त्रस्त असलेल्या एका डॉक्टरने शस्त्रक्रि येसाठी लागणाऱ्या ब्लेडने स्वत:चा गळा चिरुन आत्महत्या केल्याची घटना शनिवारी दुपारी उघडकीस आली. शिवाजी रस्त्यावरील राहत्या घराखाली असलेल्या दवाखान्यात त्यांनी आत्महत्या केली. तत्पूर्वी त्यांनी भुलीचे इंजेक्शन टोचून घेतले असावा, असा संशय पोलिसांना आहे. घटनास्थळावर आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेली चिठ्ठी, ब्लेड आणि वापरलेले इंजेक्शन पोलिसांना  सापडले.
डॉ.नितीन सुरेश अंबिके (वय ५५, रा.आनंदी प्रल्हाद निवास, ४१९ शुक्रवार पेठ, शिवाजी रस्ता) असे आत्महत्या केलेल्या डॉक्टरांचे नाव आहे. डॉ. अंबिके यांचे शिवाजी रस्त्यावरील असलेल्या खडक  पोलीस ठाण्यासमोर असलेल्या आनंदी प्रल्हाद निवास या इमारतीत तळमजल्यावर चार खोल्यांचा दवाखाना आहे. याच इमारतीत ते राहायाला आहेत. त्यांची पत्नी सविता (वय ५२) यांचे दवाखान्याला लागून असलेल्या गाळ्यात ब्यूटी पार्लर आहे. गेल्या काही दिवसांपासून ते मणक्याच्या विकाराने त्रस्त होते. त्यांना एक मुलगी असून ती अमेरिकेत वास्तव्यास आहे, अशी माहिती खडक पोलिस ठाण्याचे सहायक निरीक्षक अशोक इप्पर यांनी दिली.
डॉ. अंबिके यांच्या मणक्यावर दोन वेळा शस्त्रक्रिया करण्यात आली होती. मात्र, त्यांचे दुखणे थांबले नसल्याने ते नैराश्यात होते.शनिवारी सकाळी ते नेहमीप्रमाणे फिरायला गेले. त्यानंतर सकाळी त्यांनी दवाखाना उघडला. दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास त्यांची पत्नी सविता या दवाखान्यात आल्या. तेव्हा डॉ. अंबिके हे रक्ताच्या थारोळ्यात फरशीवर पडल्याचे त्यांनी पाहिले. त्यांनी तातडीने डॉ.अंबिके यांना रुग्णालयात दाखल केले. उपचारापूर्वीच ते मरण पावले होते.याघटनेची माहिती मिळताच खडक पोलीस ठाण्याचे सहायक निरीक्षक अशोक इप्पर, उपनिरीक्षक संजय गायकवाड, अनंत व्यवहारे यांनी तेथे धाव घेतली.
पोलिसांकडून घटनास्थळाची पाहणी करण्यात आली, तेव्हा घटनास्थळावर डॉ.अंबिके यांनी आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेली चिठ्ठी सापडली आहे. ‘ माझ्या आत्महत्येला कोणालाही जबाबदार धरु नये. शारीरिक आणि मानसिक त्रासामुळे मी आत्महत्या करत आहे. लव्ह यू ऑल’ , असे डॉ. अंबिके यांनी लिहिलेल्या चिठ्ठीत म्हटले आहे. दरम्यान, घटनास्थळी इंजेक्शन आणि सर्जिकल ब्लेड सापडले आहे. पोलिसांनी ते ताब्यात घेतले आहे. न्यायवैद्यकीय प्रयोगशाळेत ते तपासणीसाठी पाठविण्यात येणार आहे. डॉ.अंबिके यांनी भुलीचे इंजेक्शन घेतल्यानंतर ब्लेडने स्वत:चा गळा चिरला असावा, असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.