‘दारुच्या व्यसनाला मोठी प्रतिष्ठा आहे. या आजाराभोवती असलेला दिमाख व गौरव जायला हवा,’ असे मत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्यां डॉ. शैला दाभोलकर यांनी व्यक्त केले. चंद्रपूरमध्ये दारुबंदीसाठी यशस्वी लढा देणाऱ्या पारोमिता गोस्वामी आणि स्वत: व्यसनातून बाहेर पडून गेली २५ वर्षे इतरांना व्यसनमुक्त करण्यासाठी मदत करणारे प्रमोद उदार यांना डॉ. शैला दाभोलकर यांच्या हस्ते रविवारी ‘अनिता अवचट फाउंडेशन’तर्फे ‘डॉ. अनिता अवचट स्मृती संघर्ष सन्मान’ प्रदान करण्यात आला, या वेळी त्या बोलत होत्या.
मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्राचे अध्यक्ष डॉ. ए. पी. कुलकर्णी, सचिव डॉ. अनिल अवचट, उपसंचालिका मुक्ता पुणतांबेकर, विश्वस्त डॉ. आनंद नाडकर्णी या वेळी उपस्थित होते. डॉ. शैला म्हणाल्या, ‘‘मी जेव्हा दारुबंदीचे काम सुरू केले, तेव्हा दारुबंदीनंतरही १५-२० दिवसांतच त्या परिसरातील महिला छुप्या मार्गाने दारुविक्री सुरू असल्याची तक्रार घेऊन येतात हे दिसले. म्हणून व्यसनमुक्तीचे काम त्रासदायक असले तरी ते शिकून घेऊन करावे लागेल, हे मी ठरवले. सुरूवातीला ते काम करताना रडू कोसळायचे. परंतु सुनंदा (डॉ. अनिता अवचट) मला लहान बाळासारखे शिकवत पुढे नेत होती.’’
या वेळी डॉ. नाडकर्णी यांनी गोस्वामी आणि उदार यांची मुलाखत घेतली.

चंद्रपूरमधील दारुबंदीनंतरच्या प्रश्नांकडे सरकारचे दुर्लक्ष
– पारोमिता गोस्वामी

सरकारने चंद्रपूरमध्ये दारुबंदी करण्याचा घेतलेला निर्णय स्वागतार्ह आहे. परंतु त्यानंतर समोर उभ्या ठाकलेल्या प्रश्नांकडे सरकारने दुर्लक्ष केले आहे, अशी खंत पारोमिता गोस्वामी यांनी व्यक्त केली. त्या म्हणाल्या,‘‘केवळ दारुबंदी जाहीर करुन प्रश्न सुटला असे होणार नाही. दारुबंदीच्या निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी कठोर पावले उचलणे गरजेचे आहे. अवैध दारुचा पुरवठा रोखणे व या भागात व्यसनमुक्तीसाठी प्रयत्न करणे ही सरकारपुढची आव्हाने आहेत.’’