पुस्तकप्रेमी वाचक आहेत तोपर्यंत अरुण टिकेकर हे नाव पुसले जाणार नाही, अशी भावना व्यक्त करीत शिवाजी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. द. ना. धनागरे यांनी ज्येष्ठ संपादक-विचारवंत अरुण टिकेकर यांना सोमवारी श्रद्धांजली अर्पण केली.
साधना ट्रस्ट आणि रोहन प्रकाशनतर्फे अरुण टिकेकर यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी सभा आयोजित करण्यात आली होती. डॉ. द. ना. धनागरे, प्रा. प्र. ना. परांजपे, डॉ. अभय टिळक, ‘लोकसत्ता’चे सहायक संपादक मुकुंद संगोराम, उपेंद्र दीक्षित, मुकुंद टाकसाळे, राजा दीक्षित, दीपक खाडिलकर, विनय हर्डीकर, सदा डुंबरे, विनोद शिरसाठ यांनी टिकेकर यांच्या पैलूंवर प्रकाश टाकत आठवणी जागविल्या. ज्येष्ठ पत्रकार दिलीप पाडगावकर सभेच्या अध्यक्षस्थानी होते.
धनागरे म्हणाले, ग्रंथप्रेम आणि व्यासंग हा टिकेकर यांचा स्थायीभाव होता. एशियाटिक सोसायटीला आर्थिक चणचण सहन करावी लागली होती. मात्र, बांधकाम व्यावसायिक आणि राजकारणी यांच्यापासून त्यांनी संस्थेला वाचविले आणि नावलौकिक प्राप्त करून दिला. संस्थेचे पावित्र्य जपले पाहिजे हा त्यांचा आग्रह होता.
परांजपे म्हणाले, टिकेकर यांनी कधीही कोणाविरुद्ध शत्रुत्व बाळगले नाही. आजचे जग सुलभीकरणाचे झाले आहे. त्यास टिकेकर यांचा विरोध होता. सर्व सोपे करून सांगावे हा आग्रह चुकीचा आहे असे ते निग्रहाने सांगत असत.
संगोराम म्हणाले, पत्रकारितेचे औपचारिक शिक्षण घेतलेले नसतानाही टिकेकर यांनी एक वृत्तपत्र उभे केले. एका अर्थाने त्यांनी शून्यातून विश्व निर्माण केले. ‘लोकसत्ता’च्या विविध पुरवण्या लोकप्रिय केल्या.
पाडगावकर म्हणाले, कोणत्याही विचारसरणीकडे न झुकलेले टिकेकर तटस्थ होते. ज्ञानोपासना हीच त्यांची आस होती. जग अस्थिर झाले यामुळे ते उदासीन झाले होते.