भीमशाहिरी आणि बुद्धगीतांचे जलसे.. बाबासाहेबांच्या जीवनातील प्रसंगांवर आधारित निर्मिलेले चित्ररथ.. आंबेडकरी चळवळीतील वाङ्मय, बाबासाहेबांच्या प्रतिमा, पुतळे, बिल्ले, पोस्टर्स आणि उपरणे यांची विक्री करणारी दालने.. मिरवणुका, जनजागृती यात्रांद्वारे अभिवादनास शाळकरी मुलांपासून ते महाविद्यालयीन शिक्षण घेणारे युवक-युवती आणि नागरिक अशा सर्व वयोगटातील नागरिकांचा सहभाग.. विविध राजकीय पक्षांचे नेते आणि सामान्य कार्यकर्त्यांसह विविध संस्था-संघटनांच्या कार्यकर्त्यांनी अर्पण केलेले पुष्पहार.. अशा उत्साही वातावरणात भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना शतकोत्तर रौप्यमहोत्सवी जयंतीनिमित्त गुरुवारी अभिवादन करण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालयाजवळील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापाशी झालेल्या अभूतपूर्व गर्दीमुळे या परिसराला जत्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते.
महापौर प्रशांत जगताप यांनी आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केला. आयुक्त कुणाल कुमार, उपमहापौर मुकारी अलगुडे, स्थायी समिती अध्यक्ष बाळासाहेब बोडके, विरोधी पक्षनेता अरिवद शिंदे, आरपीआय गटनेता डॉ. सिद्धार्थ धेंडे या वेळी उपस्थित होते. भारतीय जनता पक्षातर्फे पालकमंत्री गिरीश बापट, शहराध्यक्ष योगेश गोगावले, नगरसेवक अशोक येनपुरे आणि पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांनी आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केला. शहरातील सर्व मतदारसंघात सरकारी योजनांची जनजागृती, स्वच्छता मोहीम, व्यसनमुक्ती अशा सव्वाशे कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. पक्षाच्या झोपडपट्टी विभाग, अल्पसंख्याक मोर्चातर्फे पुष्पहार अर्पण करण्यात आला. पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटी, मागासवर्गीय विभाग, राष्ट्रीय मजदूर काँग्रेस, मानव अधिकार विभाग आणि काँग्रेस सेवादल यांच्यातर्फे काँग्रेस भवन आणि जेधे चौक येथील आंबेडकरांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. विश्वजीत कदम या वेळी उपस्थित होते. पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे पक्ष कार्यालयात झालेल्या कार्यक्रमात शहराध्यक्ष खासदार वंदना चव्हाण यांनी प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला. राष्ट्रवादी महिला काँग्रेसतर्फे जागरण पदयात्रेचे आयोजन करण्यात आले होते. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील जयकर ग्रंथालयात डॉ. आंबेडकर यांचे साहित्य आणि दुर्मिळ छायाचित्रांचा समावेश असलेल्या दालनाचे उद्घाटन कुलगुरू डॉ. वासुदेव गाडे यांच्या हस्ते झाले. विश्वंभर चौधरी यांच्या व्याख्यानासह ‘र्सवकष समतेसह भारत महासत्ता कसा होईल’ या विषयावर परिसंवाद झाला. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे आंबेडकर यांच्या  पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. जनता दल (धर्मनिरपेक्ष) तर्फे  अशोक गायकवाड यांनी प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला.
भीम-बुद्ध गीतांचा जलसा
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, मातंग आघाडी आणि रिपब्लिकन बांधकाम सेनेतर्फे बाबासाहेबांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. भारिप-बहुजन महासंघाच्या युवा आघाडीतर्फे भीम-बुद्ध गीतांचे आयोजन करण्यात आले होते.  रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया जयभीमतर्फे डॉ. आंबेडकर उद्यानातील पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. युवा दलित पँथर, दलित पँथर, पँथर्स रिपब्लिकन पार्टी, अखिल भटक्या विमुक्त जाती जमाती महासंघ, राष्ट्रीय समाज पक्ष, महिला आघाडी यांच्यातर्फे पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. रिपब्लिकन जन-शक्ती पार्टी, रिपब्लिकन संघर्ष दल, झोपडपट्टी सुरक्षा दल यांच्यातर्फे शोभायात्रा काढून मानवंदना देण्यात आली. दलित सेनेतर्फे डॉ. आंबेडकर यांना शांततेचे नोबेल पारितोषिक देण्यात यावे अशी मागणी करण्यात आली.
विधायक उपक्रम
फुले-साठे-आंबेडकर विचार फाऊंडेशनतर्फे वृक्षारोपण, रक्तगट तपासणी शिबिर, संगीत कार्यक्रम, जीवनावश्यक वस्तू वाटप या उपक्रमांसह शोभायात्रा काढण्यात आली. महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटीतर्फे पाणी बचतीचा संदेश देणाऱ्या विद्यार्थ्यांच्या शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले होते. द डिप्रेस्ड क्लास मिशन सोसायटीतर्फे विद्यार्थ्यांनी शोभायात्रा काढली. पुणे कॅन्टॉन्मेंट कल्चर असोसिएशनतर्फे माजी मंत्री बाळासाहेब शिवरकर यांनी पुतळ्यास पुष्पहार अर्पण केला. पुणे नगर वाचन मंदिरतर्फे प्राचार्य माधव सोमण यांनी प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला. महावितरणतर्फे डॉ. आंबेडकरांच्या कार्यावर आधारित निबंध स्पर्धेतील विजेत्यांना ज्येष्ठ पत्रकार अरुण खोरे यांच्या हस्ते पारितोषिक प्रदान करण्यात आले. पुणे महानगरपालिका सार्वजनिक वाचनालयातर्फे आंबेडकर यांच्या प्रतिमेचे आणि संविधानाच्या प्रतीचे पूजन करण्यात आले. महाराष्ट्र हरिजन सेवक संघातर्फे दीक्षा सभा घेण्यात आली. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मोहन जोशी आणि डॉ. विकास आबनावे या वेळी उपस्थित होते. पी. एस. गोरले आणि कंपनीतर्फे ‘एक वही एक पेन’ अभियानास प्रारंभ करण्यात आला. राष्ट्रीय मानवाधिकार अभियान, कोथरूड येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचारमंच, स्त्री आधार केंद्र, अखिल भारतीय अधिवक्ता परिषद, राष्ट्रीय बहुजन विकास महासंघ यांच्यातर्फे पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. अजिंक्य मित्र मंडळ आणि नवसम्राट तरुण मंडळातर्फे पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला.
संचलनाद्वारे मानवंदना
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पूर्ण गणवेशातील पाचशेहून अधिक स्वयंसेवकांनी घोष आणि संचलनाद्वारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना दिली. शहरात विविध ठिकाणी प्रतिमा पूजन करण्यात आले. कसबा भागातील महात्मा फुले वाडा, सिंहगड भागातील महादेवनगर, येरवडा भागातील विनायक प्रभात शाखा, मगरपट्टा नगरातर्फे बी. टी. कवडे मैदान, सावरकर नगर, कटारिया हायस्कूल अशा ठिकाणी व्याख्यानांचे आयोजन करण्यात आले होते.
 पिंपरीतही बाबासाहेबांना अभिवादन
प्रतिनिधी, िपपरी
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त िपपरी-चिंचवड शहरात विविध उपक्रम व भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. बुधवारी मध्यरात्री बारा वाजता आतषबाजी करण्यात आली. दापोडी, भोसरी, निगडी ते िपपरी चौक अशा दुचाकी रॅली काढण्यात आल्या. गुरुवारी सकाळपासूनच िपपरी चौकातील आंबेडकरांच्या पुतळा परिसरात मोठय़ा प्रमाणात गर्दी झाली होती. विविध संस्था, संघटना व राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांनी बाबासाहेबांना अभिवादन केले. विद्यार्थ्यांनी सलगपणे अभ्यास करून बाबासाहेबांना वंदना करण्यात आली. शहरातील विविध बुद्ध विहारांमध्ये अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. महापौर शकुंतला धराडे व शहर अभियंता महावीर कांबळे यांनी हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी केली. महापालिकेच्या वतीने महापौर धराडे यांच्या हस्ते शहरातील बाबासाहेबांच्या सर्व पुतळ्यास भेट देऊन अभिवादन करण्यात आले. दापोडी येथील कार्यक्रमात आयुक्त राजीव जाधव, महापौर शकुंतला धराडे, उपमहापौर प्रभाकर वाघेरे, स्थायी समितीचे अध्यक्ष डब्बू आसवानी, नगरसेविका रमा ओव्हाळ, सनी ओव्हाळ आदी उपस्थित होते. निगडी ओटास्कीम येथील नालंदा बुद्ध विहारात बुद्धवंदना घेण्यात आली. नगरसेविका शुभांगी बोऱ्हाडे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. मंडळाचे अध्यक्ष गोरख बडवे उपस्थित होते. गौतम कांबळे यांनी सूत्रसंचालन केले.