राजकारणी हे नेहमी पुढच्या निवडणुकीचा विचार करणारे असतात, तर द्रष्टे नेते हे पुढच्या पिढीचा विचार करतात. शरद पवार हे केवळ राजकारणी नाहीत, तर ते ‘स्टेटसमन’ आहेत. देशाच्या विकासाचा ध्यास घेतलेले पवार हे पक्षातीत द्रष्टे नेते आहेत, असे मत ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर यांनी रविवारी व्यक्त केले.
माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या अमृतमहोत्सवानिमित्त रयत शिक्षण संस्थेतर्फे ‘शरद पवार-ए मास लीडर’ या पुस्तकाचे प्रकाशन डॉ. माशेलकर यांच्या हस्ते झाले. भारती विद्यापीठाचे कुलपती डॉ. पतंगराव कदम कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. महापौर दत्तात्रय धनकवडे, मराठा चेंबर ऑफ कॉमर्सचे माजी अध्यक्ष प्रतापराव पवार, विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे-पाटील, माजी खासदार विदुरा नवले, संस्थेचे पुणे विभागीय अध्यक्ष डॉ. अनिल पाटील, सचिव डॉ. गणेश ठाकूर, विजय कोलते या वेळी उपस्थित होते. माजी आमदार राम कांडगे यांच्या ‘लोकनेते शरदराव पवार’ या पुस्तकाचा दीपक बोरगावे यांनी इंग्रजी अनुवाद केला आहे.
माशेलकर म्हणाले,‘‘ पवार यांना विज्ञानाची केवळ आवडच आहे असे नाही, तर विज्ञानाविषयी कमालीचा आदर आहे. भारतीय विज्ञान परिषदेचे ८७ वे अधिवेशन पुण्यामध्ये झाले तेव्हा त्यांनी त्यासाठी राज्य सरकारमार्फत भरघोस मदत केली होती. प्रचंड वाचनातून त्यांनी ज्ञानसंपादन केले आहे हे त्यांच्याशी बोलताना सातत्याने जाणवते. कोणत्याही शाखेतील अद्ययावत संशोधनाची माहिती त्यांना असते. त्यामुळे शरद पवार यांना राजकारणी म्हणणे हे त्यांच्यावर अन्याय केल्यासारखे होईल.’’
‘‘देशामध्ये तिसऱ्या आघाडीचा प्रयोग शरदराव पवार यांनी प्रथम केला. सध्याच्या परिस्थितीत तिसऱ्या आघाडीची जुळवाजुळव करण्याची वेळ आली असून हे काम पवारच करू शकतात. बिहारच्या धर्तीवर हा प्रयोग यशस्वी झाला तर देशातील पहिल्या क्रमांकाचे पद त्यांना मिळू शकते,’’ असे डॉ. पतंगराव कदम यांनी आपल्या भाषणात सांगितले. नैसर्गिक आपत्तीनंतर संकट निवारणाच्या कामामध्ये जबरदस्त योगदान देणाऱ्या पवार यांनी देशाच्या पातळीवर आपले स्वतंत्र स्थान निर्माण केले असल्याचेही त्यांनी सांगितले.