ज्येष्ठ साहित्यिक, प्रख्यात इतिहास संशोधक आणि प्राच्यविद्येचे गाढे अभ्यासक डॉ. रामचंद्र चिंतामण ढेरे यांचे पुण्यातील त्यांच्या राहत्या घरी दीर्घ आजाराने निधन झाले. ते ८५ वर्षांचे होते. सारे आयुष्य संशोधन आणि लेखनासाठी वाहिलेल्या या ऋषितुल्य व्यक्तिमत्त्वाने शुक्रवारी पहाटे अखेरचा श्वास घेतला. डॉ. ढेरे यांच्या जाण्याने नव्या पिढीला इतिहासाशी जोडणारा महत्त्वाचा दुवा निखळल्याची भावना साहित्यिक वर्तुळात व्यक्त होत आहे. पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमीत ढेरे यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
डॉ. ढेरे यांचा भारतीय संस्कृतिचा गाढा अभ्यास होता. त्यांनी प्राच्यविद्या संशोधनामध्ये महत्त्वाचे योगदान दिले आहे. लज्जागौरी, तुळजाभवानी ही त्यांची महत्त्वाची साहित्यसंपदा. इतिहासाचे लेखन करणे म्हणजे केवळ कागदपत्रांचे पुरावे सादर करणे नव्हे. कागदपत्रांमधील माहितीचे अस्सलपण तपासताना समकालीन कागदपत्रांमध्ये सापडणारे अन्य संदर्भ त्या माहितीशी ताडून पाहणे आवश्यक असते, अशी भूमिका ते नेहमी मांडत असत.
सध्याचे प्रश्न व्यावहारिकदृष्टय़ा गंभीर झाले असून, जीवन आर्थिक पातळीवर अशक्य झाले आहे. व्यवहारावर दृष्टी ठेवली की शुद्ध ज्ञानोपासना ढिलावते. ज्ञान आणि सत्याच्या शोधासाठी काम करणे ही वेगळी प्रेरणा आहे. त्यामध्ये व्यवहार सुटणे गैरसोयीचे वाटते. व्यवहाराच्या आणि शुद्ध ज्ञानोपासनेच्या प्रेरणा वेगळय़ा आहेत, म्हणूनच त्यातील संघर्षही अटळ आहे, ढेरे यांचे हे विचार त्यांच्या आयुष्याचे सार सांगणारे आहे.
लोक साहित्य-प्राच्यविद्येचा गाढा आणि समर्पित अभ्यासक गमावला – मुख्यमंत्री
ज्येष्ठ साहित्यिक आणि विचारवंत डॉ. रामचंद्र चिंतामण ढेरे यांच्या निधनाने महाराष्ट्राने लोक साहित्य-प्राच्यविद्येचा गाढा आणि समर्पित अभ्यासक-संशोधक गमावला आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्रद्धांजली अर्पण केली.
मुख्यमंत्री आपल्या शोकसंदेशात म्हणतात, डॉ. ढेरे यांनी भारतीय इतिहास, लोकसाहित्यासोबत प्राच्यविद्येत केलेले संशोधन अतुलनीय आहे. महाराष्ट्र संस्कृतीच्या अनेक अस्पर्शित पैलूंवर प्रकाश टाकण्याचे मोलाचे कार्य त्यांनी केले. मुस्लिम मराठी संतकवी, ग्रामदैवते, सांस्कृतिक इतिहास अशा अनेक विषयांवर त्यांनी केलेले लिखाण अभ्यासकांना सदैव मार्गदर्शक ठरेल. साहित्याच्या प्रेमापोटी त्यांनी स्वत:कडील पुस्तकांचा संग्रह समाजासाठी खुला केला. त्यांच्या निधनाने एक सच्चा ज्ञानोपासक आणि निष्ठेने काम करणारा ध्येयवादी संशोधक आपण गमावला आहे. अशा या सव्यसाची व्यक्तिमत्त्वाला माझी श्रद्धांजली.