जड व व्यावसायिक वाहनांना दरवर्षी प्रादेशिक परिवहन कार्यालयातून तंदुरुस्ती प्रमाणपत्र (फिटनेस पासिंग) घेणे आवश्यक असते. ते देताना संबंधित वाहनाची कसून तपासणी करणे अपेक्षित आहे. ही तपासणी होत नसल्याने वर्षांपूर्वी न्यायालयाने हस्तक्षेप करून आरटीओत सक्षम यंत्रणा उभारण्याचे आदेश देत तपासणी थांबवली होती. यंत्रणेतील सुधारणेच्या आश्वासनावर ती पुन्हा सुरू झाली असली, तरी सद्य:स्थितीत बहुतांश वाहनांच्या तंदुरुस्तीची तपासणी पुन्हा कागदोपत्रीच सुरू झाली आहे. त्यातून वाहनांची स्थिती प्रत्यक्षात तपासली जात नसल्याने ‘आरटीओ’तूनच धोकादायक वाहने रस्त्यावर येत आहेत.
जड व व्यावसायिक वाहन रस्त्यावर धावण्यास खरोखरच सक्षम आहे का, याची पाहणी तंदुरुस्ती प्रमाणपत्र देताना होणे गरजेचे आहे. वाहनांचे ब्रेक कसे किंवा किती क्षमतेचे असावेत. दिव्यांची प्रखरता किती व कशा पद्धतीची हवी, याबाबत काही नियम आहेत. त्यानुसार ब्रेक व दिव्यांच्या तपासणीबरोबरच एका स्वतंत्र ट्रॅकवर संबंधित वाहन नेमके चालते कसे, याचीही तपासणी याअंतर्गत होणे गरजेचे असते. फिटनेसची चाचणी घेणाऱ्या वाहन निरीक्षकांनी प्रत्यक्षात ते वाहन तपासून व आवश्यकतेनुसार त्याच्या चालविण्याचीही चाचणी घेणे गरजेचे आहे.
सर्व ठोकताळय़ांनुसार एका वाहनाची फिटनेस चाचणी घेण्यासाठी कमीतकमी पंचवीस मिनिटांहून अधिक कालावधी लागतो. मात्र केवळ वाहन पाहून तंदुरुस्ती प्रमाणपत्रासाठी स्वाक्षरी करण्याचे प्रकार अनेकदा होत असल्याचे व चाचणी घेण्यासाठी कार्यालयात योग्य यंत्रणाही नसल्याचे लक्षात आल्यानंतर पुण्यातील सामाजिक कार्यकर्ते श्रीकांत कर्वे यांनी दोन वर्षांपूर्वी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. न्यायालयाने राज्य शासनाला वेळोवेळी संबंधित आरटीओ कार्यालयांमध्ये आवश्यक यंत्रणा व पायाभूत सुविधा उभारण्याच्या सूचना दिल्या. मात्र, त्याचे पालन न झाल्याने न्यायालयाने तीव्र नाराजी व्यक्त करीत आरटीओ कार्यालयांमधून फिटनेस प्रमाणपत्र देणे बंद करण्याचे आदेश दिले होते.
राज्याच्या परिवहन विभागाने न्यायालयामध्ये वाहनांच्या तंदुरुस्ती तपासणीबाबत विविध आश्वासने दिल्यानंतर पुन्हा वाहनांची तपासणी सुरू करण्यात आली. मात्र, त्याची सद्य:स्थिती नुकतीच समोर आली आहे. कर्वे यांनी बसच्या तंदुरुस्ती तपासणीबाबत माहिती अधिकारात मिळविलेल्या माहितीतून गंभीर वास्तव पुढे आले आहे. पुणे आरटीओ कार्यालयामधून एका दिवसाला सत्तरहून अधिक बसगाडय़ांना तंदुरुस्ती प्रमाणपत्र देण्यात आले असल्याचे मिळालेल्या माहितीतून स्पष्ट झाले आहे. वाहनाची योग्य पद्धतीने तपासणी करणे व वाहन निरीक्षकाने संबंधित वाहन प्रत्यक्ष चालवून पाहणे तपासणीत अत्यावश्यक आहे. त्यामुळे एका वाहनाच्या तपासणीसाठी अध्र्या तासाचा वेळ लागू शकतो. त्यामुळे एकाच दिवसात सत्तरहून अधिक वाहनांची तपासणी होत असेल, तर ती कागदोपत्रीच असल्याचे त्यातून स्पष्ट होते आहे. त्यामुळे नागरिकांच्या जीविताला धोका पोहोचवणारी वाहने रस्त्यावर येत आहेत. आरटीओ कार्यालयात वाहन तपासणीची सक्षमन यंत्रणा बसविण्याबरोबरच आरटीओमध्ये वाहन निरीक्षकांची संख्या वाढविण्याबाबत राज्याच्या परिवहन विभागाकडून दुर्लक्ष होत असल्यानेही ही गंभीर स्थिती निर्माण झाली असल्याचे दिसून येते.