जागतिक छिन्नमनस्कता (स्किझोफ्रेनिया) दिनाच्या निमित्ताने बुधवारी (२५ मे) ‘जन्मरहस्य’ या नाटकाचा पंचविसावा प्रयोग होणार आहे. या वेळी छिन्नमानसिकतेच्या आजारातून बऱ्या झालेल्या रुग्णांचा व त्यांच्या पालकांचा सत्कारही केला जाईल, अशी माहिती आयोजकांतर्फे देण्यात आली.
बुधवारी सायंकाळी पाच वाजता यशवंतराव चव्हाण नाटय़गृहात हा नाटय़प्रयोग होईल. डॉ. आनंद नाडकर्णी यांनी हे नाटक लिहिले असून त्यात या मानसिक आजाराविषयीची कथा मांडण्यात आली आहे. हा आजार नियंत्रणात ठेवणे शक्य असून त्याविषयीच्या गैरसमजुती दूर करण्याचा आपला मानस असल्याचे नाटकाच्या निर्मात्या भाग्यश्री देसाई यांनी सांगितले. देसाई यांच्यासह नाटकातील कलाकार अमिता खोपकर, गुरुराज अवधानी यांनी चैतन्य रुग्णालयात जाऊन छिन्नमानसिकतेच्या रुग्णांशी संवादही साधला.