घरग्राहक, ठेवीदार हैराण; दीड वर्षांत मुद्दल आणि ठेवींवरील व्याज थकविले

‘घराला घरपण देणारी माणसं’, ‘आधी घर, पैसे नंतर’ अशा आकर्षक जाहिराती करून घरे विकणाऱ्या पुण्यातील ‘डीएसकें’कडे गुंतवणूक केलेले आठ हजार ठेवीदार आणि घरांची नोंदणी केलेले शेकडो ग्राहक हैराण झाले आहेत. ज्यांनी डी. एस. कुलकर्णी यांच्याकडे गुंतवणूक केली त्यांची ठेव परत मिळणे दूरच, त्यांना त्यांच्या ठेवींवरचे व्याजही गेल्या दीड वर्षांत मिळालेले नाही. तसेच ज्यांनी घरांसाठी पैसे भरून नोंदणी केली आहे त्यांना घरही मिळत नाही आणि बँकेच्या कर्जाचे हप्ते मात्र सुरू, अशा कात्रीत घरग्राहक सापडले आहेत.

पुण्याजवळ असलेल्या फुरसुंगी येथे ‘डीएसके ड्रीम सिटी’ हा शंभर एकरांवरील अतिभव्य, महत्त्वाकांक्षी प्रकल्प डीएसकेंनी जाहीर केला आणि  या प्रकल्पात अपेक्षित नोंदणी झाली नाही. तेव्हापासून डी. एस. कुलकर्णी डेव्हलपर्स लिमिटेड ही त्यांची कंपनी अडचणीत आली असून इतरही अनेक गृहप्रकल्पांची कामे थांबली आहेत.

आधी घर, पैसे नंतर या योजनेत घर घेणाऱ्यांनी दहा टक्के रक्कम आधी भरुन कर्ज काढायचे आणि घराचा ताबा देईपर्यंतचे हप्ते डीएसकेंनी भरायचे अशी प्रक्रिया होती. या योजनेतही कंपनीने घर घेणाऱ्यांचे हप्ते भरलेले नाहीत आणि त्यामुळे वित्तिय संस्थांनी घर खरेदी केलेल्यांच्या मागे नोटिसा पाठवून वसुलीसाठी तगादा लावला आहे. त्यामुळे घरे नोंदवलेले ग्राहकही संतप्त आहेत.  डीएसकेंचे ठेवीदार आणि घरे नोंदवलेले ग्राहक कंपनीच्या कार्यालयात, तसेच संस्था, संघटनांकडे हेलपाटे मारत आहेत. ठेवीदारांनी संघटनाही स्थापन केली असून वेगवेगळ्या गटांच्या बैठका सुरू आहेत. गुंतवलेले मुद्दल परत मिळवण्याचे प्रयत्न संघटनेच्या माध्यमातून केले जात आहेत. दरम्यान, या ठेवींच्या परताव्याबाबत कंपनीचे धोरण काय आहे याबाबत डीएसकेंशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांचा मोबाईल बंद असल्याचा संदेश दिला जात होता.

गुंतवणुकदारांची फरफट

या कंपनीत सुमारे आठ हजार जणांनी ठेव म्हणून साडेचारशे कोटींच्या ठेवी ठेवल्या आहेत. त्यांवरील व्याज मिळणेही बंद झाले आहे. ठेव परत मिळवण्यासाठी जे ठेवीदार प्रयत्न करत आहेत किंवा मुदत पूर्ण झालेल्या ठेवीची रक्कम कंपनीकडे मागत आहेत त्यांना रक्कम दिली जात नसल्याचा अनुभव आहे. काही ठेवीदारांना दिलेले धनादेश न वटल्यामुळे परत गेले आहेत. यांतील बहुसंख्य ठेवीदार पुण्यातील असून त्यात ज्येष्ठ नागरिकांची संख्या मोठी आहे.

सोमय्या यांचा आरोप : ‘डीएसके ग्रुप’ने १२०० कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप भाजपचे खासदार किरीट सोमय्या यांनी केला आहे. याबाबतची तक्रार त्यांनी मुख्यमंत्री, अर्थमंत्रालय आणि भविष्य निर्वाहनिधी आयुक्तांकडे केली आहे. डीएसकेंनी २०१५पासून कंपनीतील ७५० कर्मचाऱ्यांचा भविष्य निर्वाहनिधीही जमा केला नसल्याचा आरोप सोमय्या यांनी ट्विटरवरून केला आहे.

काय म्हणतात डीएसके?

शेकडो गुंतवणूकदार त्यांच्या ठेवी परत मिळाव्यात, ठेवींवरील व्याज मिळावे म्हणून डीएसकेंकडे जाऊन आले आहेत. या भेटीत त्यांनी त्यांची मालमत्ता हजारो कोटींची असल्याचे सांगितले आहे. तसेच ते बाजारातील आणि बांधकाम व्यवसायातील मंदीचे कारण सांगत असून ते परिस्थिती सुधारण्यासाठी आणखी काही कालावधी मागत असल्याचे समजते.