राज्याच्या मुद्रांक शुल्क विभागाचे महासंचालक डॉ. श्रीकर परदेशी यांचे ई-मेल अकाऊंट हॅक करण्यात आल्याचे उघड झाले आहे. परदेशी यांना याबाबतची माहिती वेळेत झाल्याने त्यांनी निकटवर्तीयांना याबाबतची कल्पना दिली.
परदेशी यांच्या ईमेल आयडीवरून गुरुवारी पहाटे अनेकांना संदेश आला. त्यात म्हटले होते- ‘मी इस्तुंबूल (तुर्कस्थान) येथे आलो आहे. माझे मोबाईल व क्रेडिट कार्ड चोरीला गेले आहे. मी माझ्या बँकेत तसे कळवले असून माझे बँक व्यवहार थांबवण्यास तसेच कार्ड रद्द करण्यास सांगितले आहे. तथापि, मला भारतात परत येण्यासाठी मदतीची गरज आहे. तेथे परतल्यानंतर मी तातडीने पैसे परत देईल. आपण ऑनलाईन पद्धतीने पैसे वळवावेत.’ त्यानंतर, सकाळी नऊच्या सुमारास दुसरा संदेश आला, त्यात ८५० युरोची मागणी करण्यात आली होती. है पैसे ‘वेस्टर्न युनियन’ च्या नावाने पाठवण्याची विनंती त्यात होती. त्यात परदेशी यांचा इस्तुंबूल येथील बनावट पत्ताही देण्यात आला होता. या प्रकाराची माहिती झाल्यानंतर परदेशी यांनी ‘पासवर्ड’ बदलला, तसेच निकटवर्तीयांना याबाबतची कल्पना दिली.