मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर खंडाळा बोगदा आणि आडोशी बोगदा या भागात पाच ठिकाणी धोकादायक दरडी व दगड काढण्याचे काम मंगळवारी जोरात सुरू होते. हे काम येत्या तीन ते चार दिवसांत पूर्ण होईल, अशी माहिती हे दगड काढण्याचे काम करणाऱ्या ‘मेटाफेरी’ या कंपनीचे अधिकारी आणि द्रुतगती मार्गाची व्यवस्था पाहणाऱ्या आयआरबी कंपनीच्या अधिकाऱ्यांनी दिली. दरम्यान, या कामामुळे वाहतूक जुन्या पुणे-मुंबई महामार्गाने वळवल्याने या रस्त्यावर, तसेच खोपोली शहरात वाहतुकीची मोठी कोंडी झाली होती.
मेटाफेरी या कंपनीचे तीन अभियंते व दहा कर्मचारी आडोशी बोगद्याजवळ, तर एक अधिकारी आणि पाच कर्मचारी खंडाळा बोगद्याजवळ मंगळवारी धोकादायक दरडी काढण्याचे काम करत होते. कडय़ांवर लावण्यात आलेल्या संरक्षक जाळीवर उभे राहून हे अतिशय जोखमीचे काम करण्यात येत होते. सल झालेले दगड खाली उतरवणे, तसेच दुसरीकडे बेकर मशिनच्या साहाय्याने दगड तोडण्याचे कामही सुरूहोते. या कामात पावसामुळे व्यत्यय येत आहे. असे असले तरी हे काम लवकरच पूर्ण केले जाईल, असे तेथे काम करत असलेल्या अभियंत्यांनी सांगितले. ज्या ठिकाणांवरील धोकादायक दरडी काढण्याचे काम केले जात आहे, तेथे नव्याने काही दगड सल होत असल्याने काम वाढत आहे. त्याचा परिणाम म्हणून काम पूर्ण होण्यास थोडा अवधी लागत आहे, असे ते म्हणाले.
दरडी काढण्याचे हे काम दहा दिवसांत पूर्ण करण्याचे आश्वासन सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ िशदे यांनी यांनी दिले होते. शिंदे यांनी पुन्हा सोमवारी या ठिकाणी येऊन कामांची पाहणी केली. त्यानुसार हे काम पूर्ण करण्याचे शर्थीचे प्रयत्न द्रुतगती मार्गावर सुरू आहेत. या कामाच्या ठिकाणी मंगळवारी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी, रस्ते विकास महामंडळ, आयआरबी व डेल्टा फोर्सचे अधिकारी उपस्थित होते. त्याचप्रमाणे रायगड महामार्गचे पोलीस अधीक्षक समाधान पवार यांनीही कामाच्या ठिकाणाला भेट दिली.
दरम्यान, द्रुतगती मार्गावरील वाहतूक सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळात बंद करून ती पुणे-मुंबई महामार्गाने वळविण्यात आली आहे. त्यामुळे वरसोली टोलनाका परिसरात सुमारे तीन किलोमीटर अंतरापर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. याचा परिणाम म्हणून खोपोली शहरातही वाहतुकीची मोठी कोंडी झाली होती.