‘भूकंप होण्याच्या आधी पृथ्वीच्या वातावरणात ८० ते १०० किलोमीटर उंचीवरील ‘आयनोस्फीयर’मध्ये असलेल्या ऊर्जाभारित कणांची संख्या अचानक दुपटी-तिपटीने वाढते. ते भूकंपाचे निदर्शक असते. नेपाळमध्ये गेल्या आठवडाभरात हेच पाहायला मिळाले होते. त्यामुळे हा भूकंप अपेक्षितच होता. रिश्टर मापनावर त्याची तीव्रता ६.५ इतकी अपेक्षित होती. प्रत्यक्षात ती ७.५ इतकी नोंदवली गेली..’ पुण्यातील भूकंप अभ्यासक अरुण बापट सांगत होते. वातावरणातील ‘टोटल इलेक्ट्रॉन कंटेन्ट’ (टीईसी) यावरून भूकंपाचे भाकीत देण्याची पद्धत विकसित होत आहे. काही भूकंपतज्ज्ञ त्याचा पाठपुरावा करतात, तर काही त्याबाबत आक्षेप घेतात. बापट आणि त्यांचे काही सहकारी या पद्धतीने भूकंपांचा अभ्यास करतात.
नेपाळ येथील भूकंपानंतर बापट यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, वातावरणात ८० ते १०० किलोमीटर उंचीवर आयनोस्फीयर असते. तिथे ऊर्जाभारित (चार्ज्ड) कण असतात. त्यांची प्रतिघनमीटरमध्ये विशिष्ट संख्या असते. भूकंप होण्याआधी हा आकडा वाढत जातो. कधी कधी तो दुप्पट-तिप्पट इतका वाढतो. हे भूकंपाचे निदर्शक मानले जाते. भूकंपाच्या एक-दोन दिवस आधी त्याचा अंदाज येऊ शकतो. यावरून भूकंप कोणत्या पट्टय़ात होणार आहे, याचाही अंदाज देता येतो.
टीईसीच्या नोंदी दर अध्र्या तासाने उपलब्ध होतात त्याबाबत माहिती इंटरनेटद्वारेही मिळते. ती तपासत असताना गेल्या आठ दिवसांपासून विचित्र परिस्थिती दिसत होती. त्यामुळे १९ ते २६ एप्रिलच्या दरम्यान नेपाळमध्ये भूकंप होईल, अशी अपेक्षा होती. मात्र, ती अभ्यासाच्या पातळीवरच असल्याने ती जाहीर केली नव्हती, असे बापट म्हणाले.
भूकंपाच्या दृष्टीने जगात तीन पट्टे सक्रिय मानले जातात. त्यात प्रशांत महासागराच्या कडेवर असणारे क्षेत्र, अटलांटिक महासागराच्या मधोमधचे क्षेत्र आणि हिमालय यांचा समावेश होतो. भूशास्त्रीयदृष्टय़ा भूकवचाची हिमालयाच्या पट्टय़ातील प्लेट पुढे सरकत आहे. काही ठिकाणी तिचा वेग कमी आहे. तेथे जास्त प्रमाणात स्ट्रेस निर्माण होतो. तो जास्त वाढला की तेथून प्रचंड ऊर्जा बाहेर पडते आणि भूकंप होतो. तेच आत्ता घडले. संपूर्ण काठमांडू, पोखरा ते माउंट एव्हरेस्टपर्यंतचा भाग भूकंपप्रवण आहे. हा भाग भूकंपप्रवण असूनही त्या ठिकाणी मोठा भूकंप १९३४ नंतर आता ८० वर्षांनंतर घडत आहे. त्यामुळे तेथे स्ट्रेस साचूनच होता. हा स्ट्रेस बाहेर पडल्यामुळे आता नेपाळच्या पट्टय़ात लगेच तरी मोठा भूकंप अपेक्षित नाही.
 – डॉ. नितीन करमळकर, भूशास्त्र विभाग, पुणे विद्यापीठ