पिंपरी पालिका शिक्षण मंडळ सभापती फजल शेख यांचा राजीनामा घेऊन नव्याने निवडणुका घ्या, असे आदेश माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आणि पक्षाच्या स्थानिक नेत्यांचे ‘फिक्सिंग’ मोडीत निघाले. स्थळ निश्चितीवरून वादाच्या भोवऱ्यात अडकलेली ‘पवनाथडी जत्रा’ सांगवीत होईल, असे त्यांनी स्पष्ट केले. समाविष्ट गावांसाठी वाढीव निधी देण्याच्या मागणीसाठी सर्वपक्षीय नगरसेवकांनी आंदोलन केल्याच्या पाश्र्वभूमीवर, अधिवेशनानंतर स्वतंत्र बैठक लावण्यात येईल, असे ते म्हणाले.
अजितदादा रविवारी बालेवाडीत होते, तेव्हा पिंपरी-चिंचवडच्या नगरसेवकांनी त्यांची भेट घेतली. यावेळी झालेल्या चर्चेत शिक्षण मंडळ सभापतपिंद आणि पवनाथडीच्या जागेवरून झालेला वाद त्यांनी निकाली काढला. स्थानिक नेत्यांची फूस असल्याने निर्धारित मुदत पूर्ण झाल्यानंतरही फजल शेख यांनी राजीनामा दिला नव्हता, त्याविषयी अन्य सदस्यांनी अजितदादांकडे तक्रार केली, त्याची दखल घेत अजितदादांनी शेख यांचा राजीनामा घेण्याचे व नव्या कार्यकर्त्यांला संधी देण्याचे आदेश दिले. पवनाथडीचे स्थळ एचए मैदान, पिंपरीगाव की सांगवी असा वाद होता. तथापि, महापौरांच्या इच्छेचा मान राखून पवनाथडी सांगवीतच होईल, असे सांगून अजितदादांनी तो वादाचा विषय मार्गी लावला. समाविष्ट गावांमधील नगरसेवकांनी शनिवारी पालिकेत आंदोलन केले, त्याची माहिती घेतल्यानंतर पवारांनी या संदर्भात स्वतंत्र बैठक लावण्याची सूचना केली. यावेळी महापौर शकुंतला धराडे, पक्षनेत्या मंगला कदम, माजी महापौर योगेश बहल, नगरसेवक राजेंद्र जगताप, मंदा आल्हाट, साधना जाधव तसेच शिक्षण मंडळाचे सदस्य उपस्थित होते.