आयुक्त कुणाल कुमार यांची माहिती शिक्षण समिती स्थापन करण्याचे सर्वाधिकार महापौर आणि मुख्य सभेला आहेत. त्यानुसार निर्णय घेतल्यास शिक्षण समिती स्थापन करण्याचा प्रस्ताव महिनाभरात मुख्य सभेला प्रशासनाकडून सादर करण्यात येईल, अशी माहिती महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी मुख्य सभेत दिली. दरम्यान, महापालिकेच्या सर्व शाळांची पाहणी करून वीस दिवसांच्या आत पायाभूत सुविधा सुधारण्यासंदर्भातील कृती आराखडा तयार करण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. महापालिका शाळांची दुरवस्था आणि अन्य निगडित विषयांसंदर्भात मुख्य सभेत गुरुवारी चर्चा करण्यात आली. त्यावेळी नगरसेवकांनी शिक्षण समिती स्थापन करण्यासंदर्भात उपस्थित केलेल्या प्रश्नावर आयुक्त कुणाल कुमार यांनी ही माहिती दिली. महापालिकांमधील शिक्षण मंडळे बरखास्त करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. शिक्षण समिती किंवा शिक्षण विभागाकडे हा कार्यभार सोपवावा, असेही यात स्पष्ट केले आहे. महापालिकेचे शिक्षण मंडळ गेल्या महिन्यात बरखास्त केले. अतिरिक्त आयुक्त कार्यालयाच्या नियंत्रणखाली सध्या शाळांचा कारभार सुरू आहे. शिक्षण समिती स्थापन करण्यास सर्वच राजकीय पक्ष अनुकूल असतानाही समिती स्थापन करण्याबाबत महिन्यानंतरही कार्यवाही झालेली नाही. दरम्यान, या समितीची रूपरेषा कशी असेल याबाबत चर्चा सुरू असली तरी निवडलेल्या सोळा नगरसेवकांना या समितीमध्ये राजकीय संख्याबळानुसार स्थान मिळण्याची शक्यता आहे.