दक्षिण आशियाई देशांमध्ये निम्म्याहून अधिक प्रदेशावर या वर्षी मान्सूनचा पाऊस अपुरा असेल, असा अंदाज बुधवारी पुण्यात जाहीर करण्यात आला आहे. कमी पावसाची शक्यता असलेल्या प्रदेशात संपूर्ण महाराष्ट्रासह भारताच्या दोन-तृतीयांश भागाचा समावेश होतो, त्यामुळे हा अंदाज खरा ठरला तर देशात यंदा दुष्काळी स्थिती असेल. मात्र, भारतीय हवामान विभागाचा अधिकृत अंदाज गुरुवारी (२४ एप्रिल) जाहीर होणार असून, त्यात नेमके काय सांगितले जाते, याकडे लक्ष लागले आहे.
जागतिक हवामान विभाग (डब्ल्यूएमओ), या विभागाचे प्रादेशिक हवामान केंद्र, पुण्यातील भारतीय उष्णप्रदेशीय हवामानशास्त्र संस्था (आयआयटीएम), भारतीय हवामान संस्था (आयएमडी), कॅनडा सरकारचा पर्यावरण विभाग अशा विविध संस्थांची पुण्यात वार्षिक बैठक झाली. त्यात दक्षिण आशियातील हवामानतज्ज्ञांबरोबरच डब्ल्यूएमओ व इतरही संस्थांचे तज्ज्ञही उपस्थित होते. त्यात दक्षिण आशियासाठीच्या हवामानाचा अंदाज जाहीर करण्यात आला. त्यासाठी विविध मॉडेल्स वापरण्यात आली. त्यानुसार, यंदा या प्रदेशाच्या निम्म्याहून अधिक भागावर सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता आहे. त्यात पश्चिम भाग, मध्य भाग आणि नैर्ऋत्य (दक्षिण-पश्चिम) भागाचा समावेश आहे. त्यात संपूर्ण मध्य भारत, पश्चिम भारत, दक्षिण भारत आणि उत्तर भारत यांचा समावेश आहे. उतरेल्या भागावर सरासरीइतका पाऊस अपेक्षित आहे. मात्र, संपूर्ण दक्षिण आशियात कुठेही सरासरीपेक्षा जास्त पावसाची शक्यता नाही, असा हा अंदाज सांगतो. भारतीय हवामान विभागाचे शास्त्रज्ञ डॉ. डी. एस. पै यांनी ही माहिती दिली.
‘एल-निनो’च्या प्रभावाची शक्यता
यावर्षीच्या मान्सूनवर ‘एल-निनो’चा प्रभाव राहण्याची शक्यता आहे. त्याचा पावसावर विपरीत परिणाम अपेक्षित असतो. मात्र, याशिवाय इतरही अनेक घटक पावसावर प्रभाव टाकत असतात. याबाबत पै यांनी सांगितले की, १९५१ सालापासून आतापर्यंत पावसाळ्यात १६ वेळा एल-निनोचा प्रभाव होता. त्यापैकी आठ वेळा देशात सरासरीपेक्षा अपुरा पाऊस झाला, तर उरलेली सहा वर्षे पाऊस सरासरीइतका झाला. त्यावरून असे स्पष्ट होते की, एल-निनोचा प्रभाव असताना देशात पाऊस अपुरा पडण्याची जास्त शक्यता असते. मात्र, प्रत्येक वेळी असेच होते, याची खात्री नसते.
 
अंदाज खरा ठरला तर..
आशियाई हवामानाचा अंदाज गेली पाच वर्षे दिला जात आहे. हा अंदाज किती अचूक ठरला, याबाबत नॅशनल क्लायमेट सेंटरचे संचालक डॉ. ए. के. श्रीवास्तव यांनी सादरीकरण केले. त्यावरून ही बाब स्पष्ट झाली की, तो इतर अंदाजांप्रमाणेच नियमित खरा ठरलेला नाही. काही भागात तो यशस्वी ठरला, तर काही भागात त्याने दगा दिला आहे. गेल्या वर्षी पाकिस्तान, भारताचा वायव्य भाग, दक्षिण भाग आणि श्रीलंकेत अपुऱ्या पावसाचा अंदाज देण्यात आला होता. प्रत्यक्षात मात्र या भागावर सरासरीइतका पाऊस पडला. त्यामुळे या वर्षी तो खरा ठरला तरच भारतात दुष्काळी स्थिती उद्भवेल.