विधानसभा निवडणुकीसाठी इतर पक्षांमधून आयात केलेल्या उमेदवारांना पुणे शहरात थारा मिळाला नसल्याचे या वेळच्या निकालांनी दाखवून दिले. मात्र, त्याच वेळी पिंपरी-चिंचवड आणि ग्रामीण भागात अनेक आयाराम उमेदवार विजयी झाल्याचे पाहायला मिळाले आहे.
पुणे शहरातील आठही जागा भारतीय जनता पक्षाने पकटावल्या. या वेळी पक्षात येण्यासाठी अनेकजण इच्छुक होते. त्यात शिवाजीनगर मतदारसंघातून काँग्रेसचे माजी आमदार विनायक निम्हण हेही प्रयत्नशील होते. मात्र, त्यांच्या प्रवेशाला विरोध झाल्यामुळे तो टळला. ही बाब पक्षाच्या पथ्यावर पडली, कारण पुणेकरांनी आयात उमेदवारांना स्वीकारले नसल्याचेच निकालांनी दाखवून दिले. वडगाव शेरी मतदारसंघात मूळचे राष्ट्रवादी काँग्रेसचे असलेले सुनील टिंगरे यांनी लोकसभा निवडणुकीच्या आधी मनसेमध्ये प्रवेश केला. त्यानंतर या पक्षाकडून तिकीट न मिळाल्याने त्यांनी ऐनवेळी शिवसेनेच्या तिकिटावर निवडणूक लढवली. मात्र, भाजपचे जगदीश मुळीक यांनी त्यांचा पराभव केला. पर्वती मसदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस सोडून शिवसेनेचे तिकीट घेतलेले सचिन तावरे यांचा भाजपच्या विद्यमान आमदार माधुरी मिसाळ यांच्याकडून पराभव झाला.
पुणे कॅन्टोन्मेंट मतदारसंघात रिपब्लिकन पक्षाचे (आठवले गट) परशुराम वाडेकर यांनी ऐनवेळी शिवसेनेची उमेदवारी स्वीकारली. तेथे त्यांचा पराभव तर झालाच, इतकेच नव्हे तर त्यांना केवळ १६५०८ मते मिळाली आणि ते तिसऱ्या क्रमांकावर फेकले गेले. अशीच स्थिती कसबा पेठ मतदारसंघात दीपक मानकर यांची झाली. त्यांनी उमदेवारी अर्ज भरण्याची मुदत संपण्याआधी एक दिवस काँग्रेसमधून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यांनाही मतदारांनी स्वीकारले नाही. त्यांना १६ हजार मतेही मिळाली नाहीत, ते चौथ्या क्रमांकावर फेकले गेले. शिवाजीनगर मतदारसंघात मिलिंद एकबोटे यांनी निवडणुकीसाठी शिवसेनेत प्रवेश केला. त्यांनाही मतदारांनी स्वीकारले नाही. ते चौथ्या क्रमांकावर फेकले गेले.
पिंपरी-चिंचवडमध्ये सर्वच आयाराम
पुणे शहरात अशी स्थिती असताना पिंपरी-चिंचवडमध्ये मात्र पक्षाशी निष्ठा राखलेल्या सर्वच उमेदवारांचा पराभव झाला. पिंपरी मतदारसंघात तत्कालीन विद्यमान आमदार अण्णा बनसोडे यांचा शिवसेनेचे गौतम चाबूकस्वार यांनी पराभव झाला. चाबूकस्वार यांनी निवडणुकीपूर्वीच काँग्रेस सोडून सेनेत प्रवेश केला होता. चिंचवड मतदारसंघात विजयी झालेले लक्ष्मण जगताप यांनी निवडणुकीपूर्वी भाजपमध्ये प्रवेश केला. त्याआधीचा त्यांचा प्रवास अपक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस, शेकाप असा झाला होता. याच जगताप यांना चिंचवडमध्ये मतदारांनी निवडून दिले. भोसरी मतदारसंघातही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला आव्हान देत बंडखोरी करणारे अपक्ष उमेदवार महेश लांडगे विजयी झाले. त्यांनी राष्ट्रवादीचे आमदार विलास लांडे आणि शिवसेनेच्या सुलभा उबाळे यांचा पराभव केला.
जिल्ह्य़ातही पक्ष बदलणाऱ्यांचा विजय
पुणे जिल्ह्य़ाच्या ग्रामीण भागातही इतर पक्षांमधून आलेल्या चार उमेदवारांना विजय मिळाला आहे. जुन्नर मतदारसंघात मूळचे शिवसेनेचे असलेले शरद सोनावणे यांनी मनसेकडून निवडणूक लढवली आणि त्यांचा विजय झाला. त्यांनी राष्ट्रवादीचे अतुल बेनके आणि शिवसेनेच्या आशाताई बुचके यांचा पराभव केला. खेड-आळंदी मतदारसंघात निवडून आलेले सुरेश गोरे हे मूळचे राष्ट्रवादी काँग्रेसचे. त्यांना पक्षाचे तिकीट न मिळाल्याने त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. तेथून राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार दिलीप मोहिते यांचा पराभव करून ते विजयी झाले. असेच काहीसे दौंडमध्ये राहुल कुल आणि शिरूरमध्ये बाबुराव पाचर्णे यांच्या विजयामध्ये पाहायला मिळाले. दोघांनीही साधारण वर्षभराच्या काळात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोडला. कुल यांनी राष्ट्रीय समाज पक्षाच्या तिकिटावर राष्ट्रवादीचे रमेश थोरात यांचा पराभव केला, तर पाचर्णे यांनी भाजपच्या तिकिटावर राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार अशोक पवार यांच्यावर विजय मिळवला.
 पुणे शहरात पडलेले आयाराम
(नाव, पक्ष व मतदारसंघ या क्रमाने)
सुनील टिंगरे (शिवसेना)        वडगावशेरी
परशुराम वाडेकर (शिवसेना)    पुणे कॅन्टोन्मेंट
मिलिंद एकबोटे (शिवसेना)        शिवाजीनगर
सचिन तावरे (शिवसेना)        पर्वती
दीपक मानकर (राष्ट्रवादी)        कसबा पेठ
जिल्ह्य़ात पक्ष बदलून जिंकलेले
(नाव, पक्ष व मतदारसंघ या क्रमाने)
शरद सोनावणे (मनसे)        जुन्नर
सुरेश गोरे (शिवसेना)            खेड-आळंदी
राहुल कुल (रासप)               दौंड
बाबुराव पाचर्णे (भाजप)        शिरूर