लोकसभा निवडणुकीच्या काळात काँग्रेसमधील एका वरिष्ठ नेत्याच्या सांगण्यावरून व त्याच्या दबावातून औंध भागातील पाणीपुरवठा विस्कळीत करण्यात आला आहे. हा प्रकार गंभीर असून संबंधितांवर तातडीने कारवाई करावी, अशी मागणी माजी महापौर दत्ता गायकवाड यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत केली.
काँग्रेसचे उमेदवार विश्वजित कदम यांचा औंध भागात जोरदार प्रचार केल्यामुळे तसेच त्यांच्या पदयात्रा व रॅली आयोजित केल्यामुळे ऐन निवडणुकीच्या प्रचारातच दत्ता गायकवाड व काँग्रेसच्या एका नेत्याममध्ये जोरदार वादावादी झाली होती. त्यानंतर औंध गावठाण तसेच औंध परिसरातील पाणीपुरवठा राजकीय दबावातून विस्कळीत करण्यात आला आला. आमच्याच पक्षातील एका नेत्याच्या सांगण्यावरून हा प्रकार झाल्याचे गायकवाड यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत सांगितले. मात्र, कोणाचेही नाव न घेता योग्य ती परिस्थिती सर्वानाच माहिती आहे, असे ते म्हणाले.
निवडणुकीचा जाहीर प्रचार सुरू होईपर्यंत औंध भागाला नियमितपणे रोज सायंकाळी पाच ते रात्री अकरा या वेळेत पुरेशा दाबाने पाणी मिळत होते. हा पाणीपुरवठा आमच्या सर्व भागाला पुरेसा होता. त्यात कोणतीही अडचण नव्हती वा नागरिकांच्या तक्रारीही नव्हत्या. मात्र, अचानक काही कर्मचाऱ्यांना व अधिकाऱ्यांना हाताशी धरून आमच्या भागात व्हॉल्व्ह फिरवण्याची कामे करण्यात आली व त्यामुळे रोज नियमितपणे होणारा पाणीपुरवठा गेले पंधरा दिवस सायंकाळी सहा ते रात्री आठ एवढाच वेळ होत आहे. या बाबत नगर अभियंता प्रशांत वाघमारे यांच्याकडे तक्रार केली असून आता आयुक्त विकास देशमुख यांनाही निवेदन दिले आहे, असे गायकवाड यांनी सांगितले.
औंध भागात हा जो प्रकार करण्यात आला त्याबाबत पक्षाचे शहराध्यक्ष अभय छाजेड, तसेच वनमंत्री डॉ. पतंगराव कदम आणि विश्वजित कदम यांनाही माहिती दिली आहे. आमच्या भागातील पाणीपुरवठा तातडीने पूर्ववत करावा आणि हा प्रकार करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आल्याचेही गायकवाड म्हणाले.