कोथरूड विभागातील पहिला प्रयोग यशस्वी
विजेच्या मीटरचे चुकीचे व सरासरी रिडिंग घेण्याच्या प्रकाराला चाप लावण्यासाठी महावितरण कंपनीने तयार केलेल्या मोबाइल अ‍ॅपद्वारे मीटरचे फोटो रिडिंग घेण्याची प्रक्रिया पुणे शहरात सुरू करण्यात आली आहे. कोथरूड विभागात सुमारे १९ हजार वीजग्राहकांच्या मीटरचे रिडिंग अ‍ॅपद्वारे घेण्यात आले असून, हा पहिला प्रयोग यशस्वी झाला आहे. पुढील काळात संपूर्ण शहरात या अ‍ॅपद्वारेच मीटरचे रििडग घेतले जाणार आहे.
अ‍ॅपद्वारे मीटर रििडग घेतलेल्या वीजग्राहकांची वीजबिले तयार करण्याची प्रक्रियाही माहिती-तंत्रज्ञान विभागात सुरू करण्यात आली आहे. मुख्य अभियंता रामराव मुंडे, अधीक्षक अभियंता महेंद्र दिवाकर, माहिती व तंत्रज्ञान विभागाचे उपमहाव्यवस्थापक एकनाथ चव्हाण, कार्यकारी अभियंता ज्ञानदेव पडळकर यांनी मोबाइल अ‍ॅपद्वारे मीटर रिडिंगमध्ये सहभाग नोंदविला व अभियंता, कर्मचाऱ्यांना तांत्रिक मार्गदर्शन केले.
महावितरणकडून १ सप्टेंबरपासून पुणे परिमंडलातील सर्व वर्गवारीतील रेडिओ फ्रिक्वेंसी, इन्फ्रा रेड व मीटर रिडिंग इन्स्ट्रुमेंटने सुरू असलेले रिडिंग वगळता उर्वरित लघुदाब वीजग्राहकांच्या मीटरचे मोबाइल अ‍ॅपद्वारे फोटो रिडिंग घेण्यात येणार आहे. पूर्वतयारीसाठी महावितरण व मीटर रिडिंग एजन्सीजच्या कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात येत आहे. पुढील आठवडय़ात रास्ता पेठ, गणेशिखड व पुणे ग्रामीण मंडलातील एकूण सुमारे दोन लाख ६६ हजार वीजग्राहकांच्या मीटरचे मोबाइल अ‍ॅपद्वारे फोटो रिडिंग घेण्यात येणार आहे.
महावितरणने तयार केलेल्या मीटर रिडिंग मोबाइल अ‍ॅपद्वारे वीजजोडण्या, रोहित्र व वाहिन्यांच्या मीटरचे अचूक रिडिंग शक्य होणार आहे. त्यातून मानवी हस्तक्षेप संपुष्टात येणार आहे. अ‍ॅपद्वारेच मीटरचा फोटो काढण्यात येणार असल्याने वेगळ्या कॅमेऱ्याची गरज नाही. त्याचप्रमाणे फोटो मीटर रिडिंग घेताना अक्षांश-रेखांशची भौगोलिक नोंद अनिवार्य असल्याने वीजजोडणीच्या ठिकाणी जाऊनच मीटर रिडिंग घ्यावे लागणार आहे. त्यामुळे सरासरी, चुकीचे मीटर रिडिंग होऊ शकणार नसल्याचे महावितरणकडून सांगण्यात आले.