विघ्नहर्त्यां गणरायाचा उत्सव आता जवळ आला आहे. गणेश मंडपांच्या व देखाव्यांच्या उभारणीचे काम सध्या जोमाने सुरू आहे. हा उत्सव निर्विघ्नपणे पार पाडण्यासाठी कायदा-सुव्यवस्थेची जबाबदारी असणारी पोलीस यंत्रणा, प्रशासन व सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे आपापल्या परीने प्रयत्नशील आहेत. या उत्सवाला झगमगाट देणारी महत्त्वाची गोष्ट म्हणजे वीज.. ही वीज जितकी आवश्यक तितकीच हलगर्जीपणा झाल्यास धोकादायकही ठरते. त्यामुळे गणेश मंडळांसाठी वीजसुरक्षा महत्त्वाची असून, ‘महावितरण’ कडून या वर्षीही गणेश मंडपांसाठी अधिकृत तात्पुरते वीजजोड देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. विशेष म्हणजे ही वीज घरगुती दरापेक्षा कमी दरात उपलब्ध होणार आहे.
गणेश मंडपासाठी बहुतांश वेळेला घरगुती किंवा व्यापारी वापराच्या वीजजोडातून वीज घेतली जाते. काही वेळेला अनधिकृतपणे वीजपुरवठा घेतला जातो. त्यामधून अपघात होण्याची शक्यता असते. त्यामुळे अधिकृतपणे वीजपुरवठा घेणेच योग्य ठरते. उत्सवांसाठी महावितरण कंपनीकडून तात्पुरते वीजजोड देण्याची व्यवस्था असते. विशेष म्हणजे कोणत्याही धर्माच्या सार्वजनिक उत्सवांसाठी प्रतियुनिट तीन रुपये २७ पैसे अधिक इंधन अधिभार असे वीजदर ठेवण्यात आले आहेत. त्याच योजनेतून गणेशोत्सवासाठीही वीजपुरवठा केला जातो. उत्सवाला घरगुती किंवा वाणिज्यिक वीजजोडातून वीज घेतल्यास तो आर्थिकदृष्टय़ा महागही ठरतो. सार्वजनिक सुरक्षा लक्षात घेऊनच तात्पुरत्या वीजजोडाचे दर घरगुती वीजजोडापेक्षा कमी ठेवण्यात आले आहेत.
गणेश मंडळांना तातडीने मदतीसाठी महावितरणच्या २४ तास सुरू राहणाऱ्या टोल फ्री क्रमांक व्यवस्थेचा पर्यायही खुला आहे. १८००२००३४३५ किंवा १८००२३३३४३५ हे टोल फ्री क्रमांक उपलब्ध आहेत. त्याचप्रमाणे मंडळांचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी आपापल्या विभागातील महावितरण कंपनीच्या अभियंत्यांचे मोबाईल क्रमांक नोंदवून घ्यावेत, असे आवाहन ‘महावितरण’कडून करण्यात आले आहे.

 
गणेश मंडळांनी विजेबाबत घ्यायची दक्षता

– मंडप, रोषणाई व देखाव्यासाठी लागणारी वीजव्यवस्था अधिकृत वीजकंत्राटदाराकडूनच करून घ्यावी.
– वीजपुरवठा बंद असताना जनरेटर सुरू केल्यास एकाच न्यूट्रलमुळे जनरेटरमधील वीज लघुदाब वाहिनीत प्रवाहित होते व त्यातून अपघात होतो. त्यामुळे वीजपुरवठा व जनरेटरसाठी स्वतंत्र न्यूट्रल आवश्यक असते.
– विजेच्या वाहिन्या व रोहित्रांचा मंडप किंवा मिरवणुकीतील देखाव्यांना स्पर्श होणार नाही, याबाबत दक्षता घ्यावी.
– वीजभार लक्षात घेऊन तो सक्षमपणे पेलू शकणाऱ्या वीजवाहिन्यांचाच वापर करावा.
– मंडपासाठी पत्र्यांचा वापर होत असल्याने व पावसाळी दिवस असल्याने अनेक ठिकाणी तुटलेल्या किंवा टेपने जोडलेल्या वीजवाहिन्यांमुळेही अपघात होण्याची शक्यता असते.