आयटी हब, ऑटो क्लस्टर यांच्याबरोबरच आता इलेक्ट्रॉनिक क्लस्टरची ओळखही पुण्याला मिळणार आहे. पुण्यात इलेक्ट्रॉनिक क्लस्टर स्थापन करण्यासाठी शासनाने नुकतीच मंजुरी दिली असून त्यासाठी ५० कोटी रुपयांचे अनुदानही देण्यात येणार आहे. एकूण ७१ कोटी रुपये गुंतवणूक या प्रकल्पासाठी करण्यात येणार असून मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रिज अँड अॅग्रिकल्चरच्या सहकार्याने एक स्वतंत्र कंपनी स्थापन करण्यात आली आहे.
याबाबत मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अँड अॅग्रिकल्चरचे अध्यक्ष सतीश मगर यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत माहिती दिली. या वेळी चेंबरचे उपाध्यक्ष विक्रम साळुंखे, महासंचालक अनंत सरदेशमुख, व्हिडीओकॉनचे अनुराग धूत, रेणू इलेक्ट्रिकल्सचे अजय भागवत आदी उपस्थित होते.
इलेक्ट्रॉनिक उत्पादन करणाऱ्या कंपन्यांसाठी आता पुण्यात समाईक केंद्र उभे राहणार आहे. त्यासाठी एमसीसीआय इलेक्ट्रॉनिक क्लस्टर फाउंडेशन या नावाने स्वतंत्र कंपनी स्थापन करण्यात आली आहे. सध्या वाहन उद्योगासाठी स्थापन करण्यात आलेल्या केंद्राजवळच हे नवे केंद्र उभे राहणार आहे. ‘ब्राऊन फिल्ड इलेक्ट्रॉनिक मॅन्युफॅक्चरिंग क्लस्टर’ मुळे सध्या इलेक्ट्रॉनिक क्षेत्रात उत्पादन करणाऱ्या उद्योगांना आवश्यक असणाऱ्या सर्व सुविधा एका छत्राखाली मिळणार आहेत. ‘ब्राऊन फिल्ड’ प्रकारातील क्लस्टर असल्यामुळे उद्योगांना त्यांची आहेत त्या व्यवस्था सांभाळून यात सहभागी होता येणार आहे.
या क्लस्टरमध्ये आरेखन सुविधा, उत्पादनांच्या पृष्ठभागावर प्रक्रिया करण्यासाठीची तंत्रज्ञान सुविधा, इलेक्ट्रॉनिक उत्पादनांसाठी मॅग्नेटिक क्रिया-प्रतिक्रिया मापन केंद्र, पर्यावरण चाचणी केंद्र, परीक्षण आणि मोजणी प्रयोगशाळा, जलदगतीने प्रारूप आराखडा बनवण्यासाठीचे केंद्र, टूल रूम यांसारख्या सुविधा या क्लस्टरमध्ये उद्योजकांना मिळणार आहेत. त्यामुळे इलेक्ट्रॉनिक उत्पादन क्षेत्रातील लघू आणि मध्यम उद्योगांना चालना मिळणार आहे. सध्या पुण्यात इलेक्ट्रॉनिक उत्पादन क्षेत्राची उलाढाल ही एक हजार कोटी रुपयांच्या घरात आहे. सध्या २५० कंपन्या या क्लस्टरच्या सदस्य आहेत. या प्रकल्पासाठी एकूण ७० कोटी ८८ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली असून त्यातील ५० कोटी रुपये हे केंद्र शासनाने दिले आहेत. या प्रकल्पामुळे कंपन्यांना उत्पादनाच्या परीक्षणासाठी येणारा खर्च हा ७५ टक्क्य़ांनी कमी होणार आहे.
ऑटो क्लस्टरचा विस्तार करणार
या वेळी ऑटो क्लस्टरचेही अद्ययावतीकरण आणि विस्तार करण्यात येणार असल्याचे मगर यांनी सांगितले. ऑटो क्लस्टरमध्ये सध्या पुण्यातील चारशे कंपन्या असून येत्या दोन वर्षांत १५ कोटी रुपयांची गुंतवणूक विस्तारासाठी करण्यात येणार असल्याचे मगर यांनी सांगितले.