पंढरीच्या वारीला साथ देत अत्यावश्यक वैद्यकीय सेवेच्या १०८ या दूरध्वनी क्रमांकाच्या रुग्णवाहिकाही वारीबरोबर राहणार आहेत. देहू आणि आळंदीत रविवारपासून अत्यावश्यक वैद्यकीय सेवेचे काम सुरू झाले असून या दोनच दिवसांत किरकोळ आजारांच्या १९०० रुग्णांना या सेवेमुळे आधार मिळाला आहे. तर वारी पुण्यात आल्यावर १०८ क्रमांकाच्या ४४ रुग्णवाहिका वारक ऱ्यांना तातडीची सेवा देण्यासाठी सज्ज झाल्या आहेत.
‘महाराष्ट्र इमर्जन्सी मेडिकल सव्‍‌र्हिसेस’च्या (एमईएमएस) ७६ रुग्णवाहिका यंदा वारीसाठी उपलब्ध राहणार आहेत. ‘पुणे शहरात एरवीही ४४ एमईएमएस रुग्णवाहिका असतात. वारी आल्यावर त्यांच्या जागा बदलण्यात येतील तसेच शहरातील काही रुग्णवाहिका जिल्ह्य़ाच्या भागात हलवल्या जातील,’ अशी माहिती ‘बीव्हीजी एमईएमएस’चे प्रमुख कार्यकारी अधिकारी डॉ. ज्ञानेश्वर शेळके यांनी दिली. ते म्हणाले, ‘‘ज्या रुग्णांना रुग्णालयात हलवण्याची गरज नसते किंवा रुग्ण रुग्णालयात जाण्यास इच्छुक नसेल, तर त्यांना डॉक्टरांकरवी जागेवर उपचार दिले जातात. देहू आणि आळंदीत रविवारी ९०० तर सोमवारी १००० रुग्णांना जागेवरच उपचार देण्यात आले. सर्दी, ताप, खोकला आणि पोट बिघडण्यासारख्या साध्या आजारांचे हे रुग्ण होते. शासनाकडून आम्ही साध्या आजारांवरील औषधे घेतली आहेत तसेच आमच्याकडे सुमारे ८० जीवरक्षक औषधे व ४० जीवरक्षक उपकरणे उपलब्ध आहेत. वारीसाठीच्या अत्यावश्यक सेवेत २०० डॉक्टर सहभागी असून प्रत्येक रुग्णवाहिकेत डॉक्टर व जीवरक्षक वैद्यकीय यंत्रणा आहे.’’

यंदा पंढरपूरमध्ये जास्तीच्या ‘गो-टीम’
भाविकांची प्रचंड गर्दी असताना डॉक्टरांनी गर्दीतच रुग्ण शोधावेत व त्यांना तातडीने रुग्णवाहिकेत हलवावे यासाठी ‘गो-टीम’ची संकल्पना सुरू करण्यात आली. रुग्णवाहिका बोलवण्यात जाणारा वेळ वाचावा हा या प्रमुख हेतू होता. गेल्या वर्षी वारीत ‘पायलट प्रकल्प’ म्हणून अशा ५ ‘गो-टीम’ पंढरपुरात ठेवण्यात आल्या होत्या. कुंभमेळ्यात ही कल्पना विस्तारित स्वरूपात वापरण्यात आली. यंदा वारीच्या शेवटच्या दोन दिवसांसाठी पंढरपुरातील १२ रुग्णवाहिकांमध्ये प्रत्येकी दोन अशा प्रकारे २२ ‘गो-टीम’ कार्यरत राहतील, असेही डॉ. शेळके यांनी सांगितले.