कंपनीत नाश्त्याबरोबर चहा दिला नसल्याची कॅन्टिनचालकाची तक्रार केल्यानंतर उलट वरिष्ठानेच केलेला अपमान सहन न झाल्याने एका तीस वर्षीय कर्मचाऱ्याने आत्महत्या केल्याची घटना देहू येथे घडली आहे. त्याने सुसाईट नोटमध्ये तसे लिहून ठेवल्याने ही बाब उघड झाली. या प्रकरणी स्थानिक पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, सचिन मधुकर पवार (वय ३०, रा. मोशी, गायकवाड वस्ती) असे आत्महत्या केलेल्या कर्मचाऱ्याचे नाव आहे. चाकण येथील यश इंडस्ट्रीजमध्ये तो गेली दहा वर्षे नोकरी करत होता. मात्र, काल शुक्रवार, २२ सप्टेंबर रोजी सचिन नेहमीप्रमाणे नाश्ता करण्यासाठी कॅन्टीनमध्ये गेला यावेळी त्याला नाश्ता देण्यात आला. मात्र, त्यासोबत चहा दिला नाही. याबाबत त्याने कॅन्टिनचालकाकडे विचारणा केली. त्यानंतर सचिनने हा प्रकार सुपरवाजरच्या कानावर घातला. मात्र, त्याच्या सुपरवाजर सचिनला इतर कर्मचाऱ्यांच्यासमोर अपमानास्पद भाषेत उलट सुलट बोलल्याने सचिनला ते सहन झाले नाही. त्यामुळे त्याने देहू गांव येथील गाथा मंदिराशेजारी गळफास घेऊन आत्महत्या केली.

या प्रकरणी सचिनच्या वस्तूंची तपासणी केल्यानंतर पोलिसांना एक सुसाईड नोट सापडली. यात आत्महत्येबाबत लिहिले आहे. सचिनच्या पाठीमागे पत्नी आणि एक मुलगी आहे.