रास्ता पेठेत पैसे वाटप करीत असताना भारती विद्यापीठातील आयुर्वेदिक महाविद्यालयाच्या उपप्राचार्यासह तिघांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी मंगळवारी दुपारी पकडले आणि पोलिसांच्या ताब्यात दिले. त्यांच्याकडून मतदार यादीसह काही साहित्य आणि १६ हजारांची रोकड जप्त करण्यात आली. पकडलेले कर्मचारी काँग्रेसचे उमेदवार विश्वजित कदम यांच्यासाठी पैसे वाटप करीत होते, अशी तक्रार मनसेच्या कार्यकर्त्यांनी दिली असून, त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
डॉ. सुरेंद्र मरतड वेदपाठक, अमोल मुळे आणि उदय चंद्रकांत पाटकर अशी पकडण्यात आलेल्यांची नावे आहेत. तर, बारा जण पळून गेले आहेत. डॉ. वेदपाठक हे भारती विद्यापीठाच्या आयुर्वेदिक महाविद्यालयाचे उपप्राचार्य आहेत. तर, मुळे लॅब टेक्निशियन आहे. याबाबत मनसेच्या नगरसेविका रूपाली पाटील यांनी सांगितले, की रास्ता पेठेतील पूना कॅफेजवळ विश्वजित कदम यांचे कार्यकर्ते पैसे वाटत असल्याची माहिती नागरिकांकडून मिळाली. त्यानुसार, मनसेचे कार्यकर्ते तिथे गेले. त्यांनी तिघांना जागेवर पकडले. इतर पळून गेले. पकडलेल्या तिघांकडे ३० ते ३५ हजारांची रक्कम आहे. त्याचबरोबर मतदार यादी, यादीसमोर मतदाराचा मोबाइल क्रमांक आहे. पळून गेलेल्या कार्यकर्त्यांकडे दहा ते बारा लाखांची रोकड असल्याचा आरोप त्यांनी केला.
पकडलेल्या तिघांना रास्ता पेठेतील मनसेच्या कार्यालयात नेऊन कार्यकर्त्यांनी चोप दिला. त्यानंतर समर्थ ठाण्यात नेण्यात आले. घटनेची माहिती मिळताच सहायक पोलीस आयुक्त आत्मचरण शिंदे तिथे गेले. त्यांनी पकडण्यात आलेल्या बॅगा मनसेच्या नेत्यांसमोर तपासल्या. त्या वेळी काही रक्कम, धनादेश, मतदार यादी, वह्य़ा व मंडळांची यादी सापडली. समर्थ पोलीस ठाण्यासमोर मोठय़ा संख्येने मनसे कार्यकर्ते जमले होते. त्यांनी विश्वजित कदम यांना अटक करण्याची मागणी केली. मनसेचे उमेदवार दीपक पायगुडे यांनीही पोलीस अधिकाऱ्यांची भेट घेतली.
याबाबत पोलीस निरीक्षक दत्तात्रय पाटील यांनी सांगितले, की या प्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तिघांकडून १६ हजार रुपये, मतदार यादी, पॅम्प्लेट जप्त करण्यात आले आहे. इतर फरार आरोपींवर तपासानंतर कारवाई केली जाईल.
 
कदम यांना अटक करा – पायगुडे
पुणे हे सांस्कृतिक आणि वेगळे शहर आहे. पैशाच्या जोरावर विश्वजित कदम हा पुण्याची संस्कृती बिघडविण्याचे काम करीत आहे. अशी पद्धत राबविणाऱ्यांना कात्रज घाट दाखविल्याशिवाय राहणार नाही. विश्वजित कदमला अटक झाली पाहिजे, अशी दीपक पायगुडे यांनी मागणी केली.
 
‘पकडलेले खासगी कामासाठी आले होते’
भारती विद्यापीठाचे कुलगुरू शिवाजीराव कदम यांनी सांगितले, की पकडण्यात आलेले तिघेही खासगी कार्यक्रमासाठी पुण्यात आले होते. पैसे वाटप करीत असल्याचा आरोप खोटा आहे. भारती विद्यापीठाकडून कोणत्याही कर्मचाऱ्याला निवडणूक प्रचाराचे काम लावलेले नाही.