नामांकित कंपनीत नोकरी लावण्याचे आमिष देऊन शुक्रवार पेठेतील एस. एस. एंटरप्रायजेसचा संचालक संजय चव्हाण (वय ३०, रा. नांदेड सिटी, सिंहगड रोड) याने उच्चशिक्षित विद्यार्थ्यांची लाखो रुपयांची फसवणूक केली असल्याचा प्रकार उघडकीस आला असून, त्याच्याविरुद्ध खडक पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत विवेक चौधरी (वय २५, रा. नवी सांगवी) यांनी तक्रार दिली आहे. याबाबत चौधरी यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली. चव्हाण याच्यावर शहरातील चार पोलीस ठाण्यात एकूण १४ फसवणुकीचे गुन्हे दाखल असून त्याने विद्यार्थ्यांना नोकरी लावण्याच्या आमिषाने एकूण ५५ ते ६० लाख रुपयांना फसवले आहे. चव्हाण याने शुक्रवार पेठेत एस. एस. एंटरप्रायजेस, शास्त्री रोड येथे इलाईट ट्रेनिंग अॅन्ड प्लेसमेंट सेंटर आणि डहाणूकर कॉलनी येथील अे. जे. टॉवर येथे प्लॅनेट इंडिया ट्रेनिंग अॅन्ड प्लेसमेंट सेंटर अशी तीन ठिकाणी कार्यालये उघडलेली होती. या माध्यमातून इंजिनीअरिंग, आयटी अशा उच्चशिक्षित विद्यार्थ्यांना नोकरी लावण्याचे आमिष दाखवून फसवणूक करत आहे. तसेच, त्याचा मोठा भाऊ दीपक पंडित चव्हाण यानेही अशाच प्रकारे प्रज्वल एंटरप्रायजेसच्या माध्यमातून २५ ते ३० लाख रुपयांना फसवले आहे, असेही त्यांनी सांगितले.
चव्हाण याने गेल्या वर्षी २०१४ मध्ये मॉनेस्टरडॉटकॉम या संकेतस्थळावरुन ई-मेल पाठवून व फोन करुन चौधरी व अन्य विद्यार्थ्यांना तुमची नोकरीसाठी निवड झाली असल्याचे सांगितले. त्यानंतर त्यांना कार्यालयात भेटण्यास बोलावून माझी सिनीक्रॉन, टेक महिंद्रा अशा कंपनीमध्ये ओळख असून गेल्या चार वर्षांत मी मुलांना नोकरी लावली आहे, असे सांगून त्यांचा विश्वास संपादन केला. त्यांच्याकडे दोन लाख रुपयांची मागणी केली. ऑफर लेटर दिल्यावरच पैसे देण्याचेही सांगितले. त्यांना नामांकित कंपन्यांचे बनावट लोगो व डिजिटल स्वाक्षरी असलेले ऑफर लेटर देऊन त्यांच्याकडून दोन लाख रुपये घेतले. त्याप्रमाणे इतर दोन विद्यार्थी गणेश वाघेले याच्याकडून ३ लाख रुपये व देवास्मिता भूतान यांच्याकडून १ लाख ७० हजार रुपये घेतले. त्यांना रुजू होण्याच्या तारखेच्या दोन तीन दिवस अगोदर पुन्हा रुजू होण्याची तारीख पुढे ढकलली असल्याचे प्रत्येक वेळी सांगण्यात येत होते, असेही त्यांनी सांगितले.