‘संशोधनातूनच माणसाचे जीवनमान उंचावते. त्यासाठी शालेय स्तरापासून संशोधनाला प्रोत्साहन देणे गरजेचे आहे. संशोधक आणि तंत्रज्ञांनी एकत्र काम केल्यास अनेक प्रश्नांवर उत्तरे मिळू शकतील,’ असे मत ‘सीमेट’चे कार्यकारी संचालक डॉ. दिनेश अंमळनेरकर यांनी शनिवारी व्यक्त केले.
विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाच्यावतीने शालेय विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात येणाऱ्या ‘इन्स्पायर’ या विज्ञान प्रदर्शनाच्या राज्यस्तरीय फेरीचा समारोप अंमळनेरकर यांच्या उपस्थितीत झाला. राज्यस्तरावरून ५ प्रकल्पांची देशपातळीवरील प्रदर्शनासाठी निवड करण्यात आली आहे. या स्पर्धेत यश सावंत, गुरूजन राव, चैताली निगुडे, प्रथमेश अडसूळ, स्नेहा पाटील, किशोर चव्हाण, रूपाली बनसोडे, अंकिता उबाळे, अमृता रावते, प्रभुकिशोर जाधव या विद्यार्थ्यांनी पारितोषिके पटकावली आहेत. पारितोषिक वितरण समारंभाला विद्यापरिषदेचे संचालक नामदेवराव जरग, सहसंचालिका डॉ. शकुंतला काळे, राज्य विज्ञान शिक्षणसंस्थेचे पांडुरंग साठे, पुणे विभागाच्या उपसंचालिका सुमन शिंदे, माईर्स एमआयटीचे संचालक डॉ. विश्वनाथ कराड, कार्यकारी संचालिका डॉ. सुचित्रा नागरे आदी उपस्थित होते.
या वेळी अंमळनेरकर म्हणाले,‘‘संशोधनामुळे प्रगतीला हातभार लागतोच, पण नवनिर्मितीचा आनंदही मिळतो. संशोधनासाठी शासन आणि उद्योगपतींनी एकत्र येऊन तरतुदी केल्या पाहिजेत. त्याचप्रमाणे विज्ञानातील शोधांचे रुपांतर हे सामान्य माणसाचे जीवनमान उंचावणाऱ्या वस्तूत होणे आवश्यक आहे.’’