शहराच्या वाहतूक सुधारणेसाठी ४५ रस्त्यांवरील अतिक्रमणे हटविण्याची कारवाई सुरू करण्यात आली असून, गेल्या पाच दिवसांत १७ रस्त्यांवर कारवाई करण्यात आल्याची माहिती बुधवारी देण्यात आली.
पुणे शहरातील वाहतूक सुधारणा तसेच वाहतुकीच्या अन्य प्रश्नांबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गेल्या आठवडय़ात पुण्यातील आमदारांची बैठक बोलावली होती. शहरातील ४५ रस्त्यांवरील अतिक्रमणे तातडीने हटवून हे रस्ते व प्रमुख चौक वाहतुकीसाठी मोकळे करावेत, असा आदेश या बैठकीत पवार यांनी दिला. त्यानुसार महापालिकेचा अतिक्रमण विभाग आणि बांधकाम विभाग तसेच पोलीस यंत्रणा यांनी गेल्या शुक्रवारपासून संयुक्त कारवाई सुरू केली असून, आतापर्यंत १७ रस्त्यांवरील अतिक्रमणे हटविण्यात आल्याची माहिती अतिक्रमण विभागाचे प्रमुख रमेश शेलार यांनी बुधवारी दिली. कोथरूड, सोलापूर रस्ता, हडपसर, भवानी पेठ, येरवडा, विश्रांतवाडी, नेहरू रस्ता येथे बुधवारी कारवाई करण्यात आली. गेल्या पाच दिवसांत शिवाजी रस्ता, बाजीराव रस्ता, शास्त्री रस्ता, बिबवेवाडी, धनकवडी, शिवरकर रस्ता, भारती विद्यापीठ रस्ता, सातारा रस्ता, स्वारगेट, शिवाजीनगर, औंध, कर्वे रस्ता, नगर रस्ता, विश्रांतवाडी, धानोरी येथे कारवाई करण्यात आल्याचेही सांगण्यात आले.