बीआरटीच्या मार्गावर अपघात झाल्यावर त्या मार्गावरील सर्व बसेस अडकणे यांपासून ते प्रवाशांकडे सुट्टे पैसे नसल्यामुळे होणारी भांडणे हे पीएमपीएमएलचे रोजचे प्रश्न. त्यावर अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांने तोडगा काढला आहे. सागर अमृता रसाळ या विद्यार्थ्यांने जीपीएस प्रणालीवर आधारित उपकरण तयार केले असून त्यासाठी त्याला पेटंटही मिळाले आहे.

ताथवडे येथील राजर्षी शाहू अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘सिव्हील’ अभियांत्रिकीच्या शेवटच्या वर्षांत सागर शिकतो आहे. सिव्हील अभियांत्रिकी शाखेत शिक्षण घेत असलेल्या सागरला संगणक अभियांत्रिकीमध्ये रस आहे. एकदा सुट्टय़ा पैशांवरून प्रवासी आणि चालकात बसमध्ये चाललेली भांडणे त्याने पाहिली. त्यावरून ‘प्लॅस्टिक मनी’च्या या जमान्यात सुट्टय़ा पैशांवरून होणारी भांडणे कशी टाळता येतील याचा विचार त्याने सुरू केला. एटीएम कार्ड, डेबिट कार्ड स्वाईप करता येईल का, मोबाईल अ‍ॅपच्या माध्यमातून पैसे चुकते करता येतील का, ही अ‍ॅप्स सार्वजनिक वाहतुकीशी जोडायची झाली, तर काय करता येईल अशा वेगवेगळ्या पर्यायांची चाचपणी सागरने सुरू केली. त्यावेळी प्रवाशाने रोख पैसे द्यायचे, मात्र सुट्टे नसल्यास उरलेली रक्कम त्याच्या खात्यात कंपनीकडून जमा केली जाईल अशी काही प्रणाली तयार करण्याच्या दृष्टीने संशोधन सुरू झाले. हळूहळू ही प्रणाली कशी हवी त्याचा आराखडा तयार होऊ लागला. सुट्टय़ा पैशांबरोबरच एकाच उपकरणात आणखी काय सुविधा देता येतील त्यावरही संशोधन सुरू होते. अखेर एक ते दीड वर्षांनंतर सागरच्या संशोधनाला मूर्त रूप आले.

‘इनोव्हेटिव्ह तिकिटिंग डिव्हाईस’ असे उपकरण त्याने तयार केले. जीपीएस प्रणालीवर हे उपकरण आधारित आहे. सार्वजनिक वाहतूक प्रणालीचे सर्व व्यवस्थापन या उपकरणाच्या माध्यमातून करता येऊ शकेल. या उपकरणाच्या माध्यमातून तिकीट काढता येऊ शकेल. या उपकरणाला कॅमेराही असून तो जीपीएसशी जोडला गेला आहे. आधार कार्डाचा युनिक आयडी वाचण्याची सुविधाही असेल. त्याआधारे सुट्टे पैसे प्रवाशाच्या बँक खात्यात लगेच जमा होऊ शकतील.

बीआरटी मार्गावरील बसमध्ये काही बिघाड झाल्यास त्या मार्गावरील सर्व बसेस बिघाड झालेली बस बाजूला करेपर्यंत अडकतात. त्यावर या प्रणालीतून तोडगा मिळू शकेल. त्या मार्गिकेवरील सर्व बसेसना तत्काळ मेसेज मिळू शकेल. त्या माध्यमातून या बसेस आपला मार्ग बदलू शकतील. बिघाड झालेल्या बसची माहिती नियंत्रण कक्षाला मिळणे, कोणत्या बसेस कुठे आहेत, त्या ट्रॅफिकमध्ये अडकल्या आहेत का, इथपासून ते तिकिटांच्या हिशोबापर्यंतची कामे या माध्यमातून करता येऊ शकतील. त्यासाठी सक्षम सव्‍‌र्हर नियंत्रण कक्षात असणे आवश्यक असेल, अशी माहिती सागर याने दिली. या उपकरणाला गेल्या आठवडय़ात पेटंट मिळाले आहे.