शरीर तंदुरुस्त ठेवण्यासाठी प्रत्येकालाच व्यायाम हा गरजेचा आहे. त्यासाठी युवा पिढीमध्ये व्यायामशाळा म्हणजेच जिमचे आकर्षण सध्या मोठय़ा प्रमाणात दिसून येते. काही जण सायकल चालविण्याचा व्यायाम करतात. काही स्टॅटिक सायकिलग तर काही ट्रेडमिलवर धावण्याचा व्यायाम करतात. दैनंदिन व्यायामप्रकारात पुण्यातील ज्येष्ठ नागरिकही मागे नाहीत. रोज पर्वती चढणे, हनुमान टेकडी आणि वेताळ टेकडीवर फिरायला जाणे, उद्यानांमधील जॉिगग ट्रॅकवर फिरायला जाणे, हास्य क्लबमध्ये वेगवेगळे हास्ययोग करणे, अशा विविध पद्धतीने पुण्यातील ज्येष्ठ नागरिक तंदुरुस्तीमध्येही मागे नसल्याचे चित्र पुण्यात पाहायला मिळते.
ज्येष्ठ मंडळी रोज वेगवेगळ्या प्रकारचे व्यायाम करूनच थांबत नाहीत, तर त्यांच्यासाठी भरवल्या जाणाऱ्या अनेक स्पर्धामध्येही उत्साहाने भाग घेतात. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या पुणे विभागातर्फे दरवर्षी ज्येष्ठ नागरिकांसाठी पर्वती चढण्याची स्पर्धा आयोजित केली जाते आणि त्या स्पर्धेला मिळणारा ज्येष्ठांचा प्रतिसाद खूपच बोलका असतो. भल्या पहाटेच्या थंडीमध्ये पांघरुण घेऊन झोपेच्या अधीन होण्याऐवजी स्पोर्ट शूज आणि ट्रॅक सूट अशा पेहरावामधील पुरुष, त्याचप्रमाणे साडी परिधान केलेल्या महिला स्पर्धेत सहभागी यायला आलेल्या असतात.
पंचाहत्तराव्या वर्षी दहा वेळा पर्वती!
वयाने ज्येष्ठ असलेले तंदुरुस्तीमध्येही श्रेष्ठ आहोत याची प्रचिती देत अनेक ज्येष्ठ नागरिक पर्वती चढण्याचा विक्रम करतात. अवघ्या पाऊणशे वर्षांच्या केशवराव ढगे यांनी मध्यंतरी आयोजित स्पर्धेत दहा वेळा पर्वती चढण्याचा विक्रम करून तंदुरुस्तीचा वस्तुपाठ घालून दिला. दोन तासांच्या कालावधीत जास्तीत जास्त वेळा पर्वती चढणे आणि उतरणे असे स्वरूप असलेल्या या स्पर्धेत ज्येष्ठ नागरिकांनी मोठय़ा संख्येने सहभाग घेत उत्स्फूर्त प्रतिसाद दिला होता. पुरुषांसाठी ५१ ते ६० वर्षे, ६१ ते ७० वर्षे, ७१ ते ८० वर्षे आणि ८० वर्षांपुढील असे चार गट तर, महिलांसाठी ५१ ते ६० वर्षे, ६१ ते ७० वर्षे आणि ७१ ते ८० वर्षे असे तीन गट असतात. प्रत्यक्ष स्पर्धा सुरू झाली तेव्हा बालचमू आणि युवक-युवतींनी मोठय़ा संख्येने उपस्थित राहून ज्येष्ठांच्या या उत्साहास प्रोत्साहन देतात. टपाल खात्यातून निवृत्त झालेले शेखलाल हसनभाई पठाण यांनी यंदा दुसऱ्या वर्षी आठ फेऱ्या पूर्ण केल्या होत्या.
वयाच्या ९० व्या वर्षांपासून न चुकता या स्पर्धेमध्ये सहभागी होणारे १०३ वर्षे वयाच्या गणेश दिनकर यांनी यंदा पर्वती चढण्याची एक फेरी पूर्ण केली. ही स्पर्धा सुरू झाल्यापासून ते भाग घेत आहेत. गोळीबार मैदान चौकातील लष्करी लेखा (डिफेन्स अकौंट्स) कार्यालयातून सेवानिवृत्त झालेल्या गणेश दिनकर यांना चालण्याचा छंद आहे. गेल्या वर्षी त्यांनी पर्वती चढण्याच्या दोन फेऱ्या पूर्ण केल्या होत्या. प्रभाकर वाणी यांनी ७२ व्या वर्षी पर्वतीच्या १६ फेऱ्या पूर्ण करून ७१ ते ८० वयोगटामध्ये प्रथम क्रमांक पटकाविला. ३५ वर्षे नोकरी करून सेवानिवृत्त झाल्यानंतर सह्य़ाद्री ट्रेकर्स संस्थेमार्फत दर रविवारी ते सिंहगडावर जात आहेत.