अच्युत गोडबोले यांचे मत, देआसरा कनेक्ट क्लबचे उद्घाटन
भारतामध्ये बेरोजगारीचा प्रश्न मोठा असून आगामी काळात तो आणखी जटिल होईल. नवे रोजगार निर्माण करण्यामध्ये अनुशेष बाकी असताना तंत्रज्ञान बदलाच्या वेगामुळे सध्याचे रोजगारही धोक्यात आले आहेत. या आव्हानावर मात करण्यासाठी उद्योजकता विकास हाच प्रभावी उपाय आहे, असे मत प्रसिद्ध संगणकतज्ज्ञ-लेखक अच्युत गोडबोले यांनी व्यक्त केले.
जागतिक उद्योजकता दिनाचे औचित्य साधून देआसरा फाउंडेशनतर्फे नवोदित व्यावसायिकांना समविचारी उद्योजकांशी जोडण्याच्या उद्देशातून सुरू करण्यात आलेल्या देआसरा कनेक्ट क्लबचे उद्घाटन गोडबोले यांच्या हस्ते झाले. फाउंडेशनचे संचालक एस. आर. जोशी, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रज्ञा गोडबोले या वेळी उपस्थित होत्या.
गोडबोले म्हणाले, ‘‘भारतामध्ये सध्या वर्षांला दोन कोटी रोजगार निर्माण होण्याची गरज आहे. परंतु, गेल्या वर्षी केवळ एक कोटी ३० लाख नोकरीच्या संधी उपलब्ध झाल्या. रोजगार निर्मितीचा वेग मंदावला असल्यामुळे रोजगाराचा प्रचंड अनुशेष निर्माण झाला आहे. माहिती तंत्रज्ञान आणि ऑटोमेशन यांच्या वेगामुळे जुने ते कालबाह्य़ होण्याचे प्रमाणही वाढत आहे. बडय़ा कंपन्यांतील ऑटोमेशनमुळे या वर्षी एकटय़ा माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील चार लाख नोकऱ्या संपुष्टात येतील, असा अंदाज आहे. सध्याच्या काळात स्थिर आणि दीर्घकालीन नोकरीची शाश्वती राहिलेली नाही. आधुनिक तंत्रज्ञानामुळे जुने रद्दबातल होत असले तरी नवनव्या संधीही निर्माण होत आहेत. पुढील काळ हा सेवा क्षेत्र तसेच छोटय़ा आणि मध्यम उद्योगातून रोजगार निर्मितीला पोषक आहे. शालेय वयापासूनच उद्योजकता रुजविण्याचे प्रयत्न व्हायला हवेत आणि पालकांनीही आपल्या मुलांवर नोकरी लादण्यापेक्षा उद्योग उभारण्यात त्यांच्या पाठीशी राहिले पाहिजे.’’
उद्योजक म्हणून घडत असताना तरुणांमध्ये दूरदृष्टी आणि ध्येयाप्रति एकाग्रता हे गुण बाणवणे आवश्यक आहे. कल्पकता ही केवळ दैवी देणगी नसून ती शिकूनही साध्य करता येते. जोखीम घेणाऱ्या व्यावसायिकांना अपयश किंवा अडथळे आल्यास त्यांना आधार देण्याची व्यवस्था सरकारने उभारली पाहिजे, असेही गोडबोले यांनी सांगितले.
प्रज्ञा गोडबोले यांनी प्रास्ताविकात फाउंडेशनच्या उपक्रमांची माहिती दिली. रूपाली श्रीश्रीमाळ यांनी सूत्रसंचालन केले.