टक्केवारीसाठी मर्जीतील ठेकेदारांवर कोटय़वधी रूपयांची उधळपट्टी करणाऱ्या पिंपरी पालिकेने शहरातील मैलाशुध्दीकरण प्रकल्प पाहण्यासाठी येणारे विद्यार्थी, नागरिक व अभ्यासकांकडून शुल्क आकारणी करण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबतचा प्रस्ताव स्थायी समितीच्या मंगळवारी (१० नोव्हेंबर) होणाऱ्या बैठकीत मांडण्यात आला आहे.
महापालिकेच्या वतीने शहरात जवळपास १३ मैलाशुध्दीकरण प्रकल्प उभारण्यात आले आहेत. या केंद्रांना विद्यार्थी, पर्यटक, नागरिक भेट देण्यासाठी येतात. त्यासाठी यापूर्वी कोणतेही शुल्क नव्हते. मात्र, उत्पन्नवाढीच्या दृष्टीने आता एका व्यक्तीसाठी तसेच अभ्यासकांसाठी प्रत्येकी १०० रूपये शुल्क आकारण्यात येणार आहे. याशिवाय, खासगी शाळांच्या गटासाठी ५०० ते १२०० रूपये, महाविद्यालयीन गटांसाठी १८०० रूपये आकारण्यात येणार आहेत. याबाबतचा निर्णय मंगळवारी होणार आहे. महापालिकेतील भ्रष्टाचाराने कळस गाठला आहे. वेगवेगळ्या निमित्ताने कोटय़वधी रूपयांची उधळपट्टी सातत्याने व संगनमताने सुरूच आहे. सत्ताधारी राष्ट्रवादीच्या मर्जीतील एका कंत्राटदारावर तब्बल १० कोटी रूपये ओवाळून टाकण्याचा ‘पराक्रम’ स्थायी समितीने नुकताच केला होता. मात्र, बोभाटा झाल्याने हा ‘डाव’ फसला. एकीकडे असे चित्र असताना प्रकल्पपाहणीसाठी शुल्क आकारणी लागू करण्याच्या पालिकेच्या निर्णयावर टीका होत आहे.