शिरूर लोकसभेतील चुरशीच्या लढतीत महत्त्वपूर्ण भूमिका बजावणाऱ्या भोसरी विधानसभेच्या क्षेत्रात गुरूवारी मतदानाच्या वेळी भलताच प्रकार आढळून आला. धनुष्यबाणाच्या चिन्हासमोरील बटन दाबल्यानंतर ‘नोटा’च्या खात्यात ते मत जमा होत होते. शिवसेनेचे उमेदवार शिवाजीराव आढळराव यांनी याबाबतची तक्रार केल्यानंतर संबंधित केंद्रातील मशिन बदलण्यात आले.
भोसरीतील गुळवे वस्तीच्या मतदान केंद्रात हा प्रकार घडला. वोटिंग मशीनमध्ये पहिल्या क्रमांकावर धनुष्यबाणाचे चिन्ह होते. तर, १५ व्या क्रमांकावर ‘नोटा’चे चिन्ह होते. धनुष्यबाणाला मत दिल्यानंतर ते मत ‘नोटा’ला जात होते. सकाळी साडेनऊपर्यंत हा प्रकार होत होता व तशाप्रकारे ४७ मते पडल्याचे सांगण्यात आले. ही बाब शिवसैनिकांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी हा प्रकार आढळरावांना सांगितला. त्यांनी निवडणूक विभागाकडे तक्रार केली व त्यानंतर या केंद्रातील मशिन बदलण्यात आल्या. संवेदनशील मानल्या जाणाऱ्या भोसरीत शांततेत मतदान झाले. प्राथमिक अंदाजानुसार भोसरीत ५५ टक्के मतदान झाले. गेल्या वेळी हा आकडा ४५ टक्के होता. मतदारांची नावे नव्हती म्हणून अनेक ठिकाणी वादाचे प्रसंग उद्भवले. आमची काय चूक झाली, असा मुद्दा मतदानाची संधी डावलल्या गेलेल्या नागरिकांनी मांडला. जवळपास १५ ते २० टक्के मतदारांची नावे नव्हती. नेहरूनगरच्या अण्णासाहेब मगर स्टेडियम मतदान केंद्रात याच कारणावरून गोंधळ झाला. संभाजीनगर येथील मतदान केंद्रात दोन मशीन बंद पडल्या व अध्र्या तासाने पुन्हा सुरू झाल्या. या वेळी मतदारांच्या रांगा लागल्या होत्या.
..तरी मतदान ‘हाता’लाच!
कोथरूड मतदार संघातील शामराव कलमाडी हायस्कूल येथील मतदान केंद्रावर सकाळी आठ वाजता कोणतेही बटन दाबले तरी हाताच्या चिन्हासमोरील दिवा लागत असल्याचे दिसून आले. याबाबत काही जणांनी तक्रार केल्यानंतर हे मतदान यंत्र बदलण्यात आले. पहिल्या मतदान यंत्रावर २८ लोकांनी मतदान केले होते. त्यांना पुन्हा मतदान करण्यास सांगितले. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर मतदान केंद्रावर गोंधळ निर्माण झाला. मनसे आणि भाजपचे कार्यकर्ते जमा झाले होते. त्यामुळे या ठिकाणी बंदोबस्त वाढविण्यात आला होता. मतदान यंत्र बदलण्यासाठी वेळ गेल्यामुळे एक तास मतदान थांबविण्यात आले होते. सकाळी सव्वा नऊ वाजता मतदान यंत्र बदलल्यानंतर पुन्हा मतदान प्रक्रिया सुरळित सुरू झाली.