शुल्क नियंत्रण कायदा अस्तित्वात आला, तरी प्रत्यक्षात मात्र अद्यापही शुल्कासाठी विद्यार्थ्यांची अडवणूक सुरूच असल्याचे समोर येत आहे. विद्यार्थ्यांचे नुकसान झाले तरी चालेल.. पण शुल्क मिळालेच पाहिजे! असा पवित्रा घेऊन शाळेने काही विद्यार्थ्यांचे दहावीचे परीक्षेचे प्रवेशपत्रच अडवून ठेवल्याची तक्रार पालकांनी केली आहे.
राज्यमंडळाची दहावीची परीक्षा मंगळवारपासून (३ मार्च) सुरू होत आहे. पिंपरीतील डी.वाय. पाटील पब्लिक स्कूल या शाळेने काही विद्यार्थ्यांचे दहावीचे प्रवेशपत्र अडवून ठेवले आहे. या शाळेने सलग दोन वर्षे शुल्क वाढवले. त्याला काही पालकांनी विरोध केला. शुल्क वाढवण्यासाठी शाळेने शिक्षण उपसंचालक कार्यालयाची मान्यता घेतली नसल्याचे पालकांचे म्हणणे आहे. शाळेविरोधात पालकांनी शिक्षण विभागाकडे तक्रार केली. मात्र, त्या तक्रारीबाबत शिक्षण विभागाकडून काहीच अंतिम निर्णय अद्याप झालेला नाही. अंतिम निर्णय होत नाही, तोपर्यंत शाळेचे शुल्क न भरण्याचा निर्णय पालकांनी घेतला. शुल्कवाढीला विरोध करणाऱ्या पालकांच्या विद्यार्थ्यांना शाळेने तिमाही, सहामाही आणि पूर्वपरीक्षेला बसू दिले नाही. आता शाळेने या विद्यार्थ्यांचे बोर्डाच्या परीक्षेचे प्रवेशपत्रच अडवून ठेवले आहे. शाळेचे गेल्यावर्षीप्रमाणे शुल्क भरण्याची तयारी पालकांनी दाखवली. त्याचप्रमाणे शासनाने सूचना दिल्यास नव्या दराने शुल्क भरण्यासाठी आम्ही तयार आहोत, असे पालकांचे म्हणणे आहे. मात्र, यावर्षी वाढवलेले शुल्क भरल्याशिवाय विद्यार्थ्यांना प्रवेशपत्रच दिले जाणार नाही, असा पवित्रा शाळेने घेतला आहे.
शाळेच्या विरोधात पालकांनी पोलिसांकडेही धाव घेतली आहे. आशा जाधव, संदीप चव्हाण यांसह पाच ते सहा पालकांनी शाळेविरोधांत तक्रार केली आहे. याबाबत शाळेच्या मुख्याध्यापिकांशी संपर्क होऊ शकला नाही.