भारताच्या ऑक्टोबर २०१३ मध्ये सुरू झालेल्या पहिल्या मंगळ मोहिमेचा अंतिम टप्पा २४ सप्टेंबरपासून सुरू होणार असून, त्यानिमित्ताने भारतीय मंगळयान मोहीम जनजागृती प्रकल्पाअंतर्गत तीन दिवसीय ‘खगोलशास्त्र व अवकाशशास्त्र’ या विषयावरील प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे.
विज्ञान भारती, फग्र्युसन महाविद्यालय आणि ज्योतिर्विद्या परिसंस्था यांच्या वतीने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. संस्थांतर्फे आयोजित पत्रकार परिषदेत ही माहिती देण्यात आली. या प्रदर्शनात विविध देशांच्या मंगळयान मोहिमांची माहिती, यानांच्या प्रतिकृती दाखवण्यात येणार आहेत. तसेच मंगळयान मोहिमेशी संबंधित माहितीपटही दाखवले जाणार आहेत. प्रदर्शन २४ ते २६ सप्टेंबर या कालावधीत फग्र्युसन महाविद्यालयातील रिक्रिएशन हॉल येथे सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत खुले राहणार आहे. प्रदर्शनाचे उद्घाटन २४ सप्टेंबर रोजी स्पेस अॅप्लिकेशन सेंटर व विक्रम साराभाई स्पेस सेंटरचे निवृत्त संचालक डॉ. प्रमोद काळे यांच्या हस्ते होणार आहे. या वेळी इस्त्रोचे निवृत्त संचालक सुरेश नाईक यांची प्रमुख उपस्थिती असेल. एका राष्ट्रीय प्रकल्पावरील अशा प्रकारचा हा पहिलाच उपक्रम असल्याचे सांगण्यात आले.
‘भारताची मंगळयान मोहीम व अवकाशशास्त्र व इस्त्रोतील करिअरच्या संधी’ या विषयावरील चर्चासत्र २५ सप्टेंबर रोजी आयोजित करण्यात आले असून विज्ञान भारतीचे अध्यक्ष डॉ. विजय भटकर यांच्या हस्ते त्याचे उद्घाटन होईल. हे चर्चासत्र फग्र्युसन महाविद्यालयाच्या एन. एम. वाडिया अॅम्फी थिअेटरमध्ये सकाळी ९.३० या वेळेत होणार आहे.