माणसाचे जीवन हे विसंगतीने भरलेले आहे. ही विसंगती जागोजागी दिसते. त्यामुळे विषय विपुल असले, तरी त्यातील विसंगती हुडकून ती व्यंगचित्रांत मांडण्यासाठीची नजर हवी, अशी भावना ज्येष्ठ व्यंगचित्रकार शि. द. फडणीस यांनी सोमवारी व्यक्त केली. नवीन विषय मला सुचतात. पण, त्यांना चित्ररूप देण्यासाठी आता वयोमानामुळे हात तेवढासा काम करू देत नाही, असेही त्यांनी सांगितले.
ज्येष्ठ व्यंगचित्रकार शि. द. फडणीस यांनी वयाच्या नव्वदीमध्ये केलेले पदार्पण आणि मुंबई येथील जहांगीर आर्ट गॅलरी येथे भरलेल्या त्यांच्या पहिल्या प्रदर्शनाचा सुवर्णमहोत्सव असे दुहेरी औचित्य साधून ‘हसरी गॅलरी’ या हास्यचित्र प्रदर्शनाचे उद्घाटन ज्येष्ठ अभिनेते डॉ. मोहन आगाशे यांच्या हस्ते झाले. ज्योत्स्ना प्रकाशनतर्फे फडणीस यांच्या ‘हसरी गॅलरी’ या पुस्तकाचे प्रकाशन अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या अध्यक्षा डॉ. माधवी वैद्य यांच्या हस्ते झाले. ज्येष्ठ लेखिका शकुंतला फडणीस आणि ‘चिंटू’चे निर्माते चारुहास पंडित या वेळी उपस्थित होते.
व्यंगचित्र चितारण्यासाठी विनोदबुद्धी हवी. जीवनाकडे पाहण्याची विनोद ही एक दृष्टी आहे. आजूबाजूला काय घडते आहे ते टिपण्याची निरीक्षणशक्ती आणि रेखाटनाची शक्ती या तीन गुणांच्या आधारे कोणालाही चांगला व्यंगचित्रकार होता येईल. एखादे चित्र आपल्याला भावले तर ते रसिकांनाही आवडते. मग चित्रातला विषय कधीही जुना होत नाही. कितीही वर्षांनी पाहिले तरी ते चित्र तितकेच ताजेतवाने आणि टवटवीत वाटते असे सांगताना फडणीस यांनी जणू आपला चित्रप्रवास नेमक्या शब्दांत मांडला. चांगले व्यंगचित्र चितारण्यासाठी आधी चित्राची भाषा आत्मसात करणे महत्त्वाचे आहे. चित्रातील व्यंग हे कसेतरी ओढूनताणून आणलेले नसावे. तर, ते पाहणाऱ्यालाही हसवायला लावेल असे प्रमाणबद्ध असले पाहिजे. चित्र ही शब्दांची पुढची पायरी आहे. शब्दांत मांडताना येणाऱ्या मर्यादा चित्रांत जाणवत नाहीत. त्या दृष्टीने हे माध्यम सशक्त आहे. गायनाप्रमाणेच व्यंगचित्रांचाही रियाज असतो, असेही त्यांनी सांगितले.

‘हसरी गॅलरी’ झाली खुली
टक्कल असलेल्या डोक्यावर हेअर टॉनिक लावणारा नवरा आणि लांबसडक केसांना कात्री लावणारी बायको.. घरात ढाराढूर झोपलेली गृहिणी आणि हातामध्ये पातेले घेऊन गवळ्याकडून दूध घेणारे मांजर.. कानात डूल म्हणून घातलेल्या चाव्यांच्या जुडग्यातील एका चावीने घराचे कुलूप उघडणारी महिला.. ब्रश हातामध्ये घेऊन पुतळ्याचे दात घासणारी महिला.. मांडीवर झोपलेल्या मुलाला बाटलीने दूध पाजतेय खरी पण, चित्रपटविषयक मासिक वाचण्यात गुंग झालेल्या महिलेच्या ते दूध मांजर पितेय हेच ध्यानात येत नाही.. हुकमी रेषा आणि जीवनातील विसंगतीवर शब्दांवाचून भाष्य करीत ओठांवर खुदकन हसू फुलविणारी ‘शिदं’ची ‘हसरी गॅलरी’ सोमवारी तब्बल तीन दशकांनी रसिकांसाठी खुली झाली. रोटरी क्लब ऑफ पुणे हिलसाइडतर्फे बालगंधर्व कलादालन येथे भरविण्यात आलेले हे प्रदर्शन रविवापर्यंत (३० नोव्हेंबर) दररोज सकाळी दहा ते रात्री आठ या वेळात खुले राहणार आहे.
आगाशे यांनी ‘घाशीराम कोतवाल’ नाटकात नाना फडणवीस रंगविला आहे. या फडणीसने काय रंगविले हे दाखविण्यासाठी त्यांना निमंत्रित केले असल्याचे सांगत शि. द. फडणीस यांनी हास्याची कारंजी फुलविली. ‘कमी बोल आणि काही करी कर’ हे फडणीस यांचे ऋण माझ्यावर असल्याचे डॉ. आगाशे यांनी सांगितले. सृजनशक्ती कलेच्या माध्यमातून विकसित होते हे शिदंच्या व्यंगचित्रांतून अधोरेखित होत असल्याचे माधवी वैद्य यांनी सांगितले. फडणीससरांच्या प्रभावामुळे मी व्यंगचित्रकार झालो. त्यांनी केलेले संस्कार मला चिंटू करताना उपयोगी पडले, अशी भावना चारुहास पंडित यांनी व्यक्त केली.