मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर खंडाळा एक्झिटजवळ तेलाचा (ऑईल) टँकर उलटून मुंबई व पुणे अशा दोन्ही मार्गिकेवर तेल पसरल्याने द्रुतगती महामार्गावरील वाहतूक पूर्णत ठप्प झाली. महामार्गावर जवळपास सहा ते सात किलोमीटर अंतरापर्यंत दुतर्फा वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. शनिवारी सकाळी पावणेसहा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी द्रुतगती मार्गावरील वाहतूक मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्गावर वळविण्यात आल्याने लोणावळा शहर व खोपोली शहरातील वाहतूकदेखिल ठप्प झाली होती.
दरम्यान दुपारी साडेतीनच्या सुमारास द्रुतगती मार्गावरील वाहतूक सुरळीत झाली. खंडाळा महामार्ग पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पुण्याहून मुंबईच्या दिशेने कच्चे तेल घेऊन जाणारा टँकर खंडाळा एक्झिट येथील वळण व उतारावर चालकाचे नियंत्रण सुटल्याने ५.४५च्या सुमारास रस्त्यावर उलटला. यामध्ये मुंबई व पुणे दोन्ही मार्गिकेवर तेल पसरल्याने वाहतूक ठप्प झाली होती. मार्गावर मोठय़ा प्रमाणात तेल पसरल्याने सुरक्षेचा उपाय म्हणून द्रुतगतीवरील वाहतूक पूर्णपणे थांबवण्यात आली. वाहतूक जुन्या पुणे-मुंबई रस्त्यावर (राष्ट्रीय महामार्ग क्र. ४ ) वळविण्यात आली. जुन्या पुणे-मुंबई रस्त्यावर वाहतुकीचा ताण पडल्याने लोणावळा व खोपोलीत वाहतूक ठप्प झाली होती.
घटनेची माहिती कळताच खंडाळा महामार्ग पोलीस व आयआरबीच्या कर्मचाऱ्यांनी तातडीने तेल पसरलेल्या परिसरात माती व डस्ट टाकण्याचे काम सुरू केले. मात्र उतारामुळे जवळपास अर्धा किलोमीटर परिसरात तेल पसरल्याने वाहने घसरण्याची शक्यता होती. त्यामुळे वाहनचालकांची तारांबळ उडाली होती. सकाळी आठच्या सुमारास पुण्याकडे येणारी तसेच अकरा वाजता तीनही मार्गिका सुरू करण्यात आल्या. अपघातग्रस्त टँकर बाजूला करण्यात आला. त्यानंतर अकराच्या सुमारास मुंबईकडे जाणारी एक मार्गिका  सुरू करण्यात आली. सकाळी सहा पासून या मार्गावरील वाहतूक पूर्णत ठप्प झाल्याने ती पूर्ववत होण्यास वेळ लागला. शनिवार व रविवारच्या सुट्टीमुळे पर्यटक मोठय़ा संख्येने लोणावळा परिसरात येतात. द्रुतगती मार्गावर वाहनचालक या कोंडीत अडकले होते. पाणी व नाश्ता न मिळाल्याने प्रवासी आणि वाहनचालक संतप्त झाले होते.
‘द्रुतगती’वरील अपघातामुळे
एसटीची वाहतूक विस्कळीत
पुणे- मुंबई द्रुतगती मार्गावर शनिवारी सकाळी झालेल्या अपघातामुळे वाहतूक ठप्प झाल्याने पुणे- मुंबई दरम्यानची एसटीची वाहतूकही विस्कळीत झाली. संध्याकाळी उशिरापर्यंत एसटीच्या गाडय़ा विलंबाने धावत होत्या. त्यामुळे प्रवाशांचे हाल झाले.
द्रुतगती मार्गावर खंडाळ्याजवळ तेलाचा टँकर पलटल्याने रस्त्याच्या दोन्ही मार्गिकेवर तेल सांडून वाहतूक बंद झाली. त्यामुळे अनेक वाहने रस्त्यावरच अडकून पडली. त्यामुळे एसटीच्या गाडय़ांचाही समावेश होता. पुणे, स्वारगेट व शिवाजीनगर स्थानकातून सकाळी साडेनऊच्या नंतर मुंबई, दादर व ठाण्यासाठी सोडण्यात आलेल्या शिवनेरी व हिरकणी बसगाडय़ा द्रुतगती मार्गावरील वाहतूक कोंडीमध्ये अडकून पडल्या होत्या. हीच अवस्था मुंबईतून पुण्याकडे येणाऱ्या बसचीही झाली.
दुपापर्यंत एसटीच्या गाडय़ांना मुंबईत पोहोचण्यासाठी सुमारे अडीच ते तीन तासांचा कालावधी लागत होता. स्वारगेट स्थानकातून दिवसभरात ठाण्याकडे जाण्यासाठी २२ हिरकणी, ३२ शिवनेरी बस सोडल्या जातात. दादरसाठी १६, बोरीवलीसाठी १८ शिवनेरी सोडल्या जातात. या सर्व गाडय़ा दिवसभर उशिराने धावत होत्या. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय झाली.