न्यायालयाचा बनावट जामीन आदेश तयार करून खुनाच्या गुन्ह्य़ातील दोन आरोपींना कारागृहातून बाहेर काढणारा न्यायालयातील लिपीक दीपक राऊत आणि माजी नगरसेवक तानाजी निम्हण यांच्या पोलीस कोठडीत २३ डिसेंबरपर्यंत वाढ करण्यात आली आहे. पोलिसांनी तपासात राऊतकडून दीड लाख रुपये, एक मोटार आणि दोन बनावट जामीनपत्र जप्त केली आहेत.
माजी नगरसेवक निम्हण यांची चेतन आणि तुषार निम्हण ही दोन मुले खुनाच्या गुन्ह्य़ात येरवडा कारागृहात होती. राऊत याने त्यांना बाहेर काढण्यासाठी दहा लाख रुपये घेऊन न्यायालयाच्या नावाने बनावट जामीनपत्र तयार केले. ते येरवडा कारागृहातील पेटीत टाकून दोघांची सुटका केली. मात्र, न्यायालयाने दोघांबाबत विचारणा केल्यानंतर हा सर्व प्रकार उघडकीस आला होता. याप्रकरणी राऊत व निम्हण यांना अटक केली होती. त्या दोघांना २१ डिसेंबपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. त्याची मुदत आज संपत असल्यामुळे त्यांना न्यायालयात हजर केले.
राऊत याच्या वतीने अ‍ॅड. मिलिंद पवार आणि निम्हण याच्या वतीने अ‍ॅड. बिपीन पाटोळे यांनी पोलीस कोठडीला विरोध केला. तर सरकारी वकील राजेंद्र सूर्यवंशी यांनी आरोपींना आणखी काही व्यक्तींना बनावट जामीन आदेश बनवून दिला असण्याची शक्यता आहे. त्याचा तपास करण्यासाठी पोलीस कोठडी वाढवून देण्याची मागणी केली. ती न्यायालयाने मान्य केली.