पत्नी व कुटुंबाला सोडून देत दुसरा संसार थाटणाऱ्या पित्याविरुद्ध मुलगा उभा राहिला आहे. त्याने आपल्या पित्याने केलेली फसवणूक माहिती अधिकाराखाली अर्ज करून उघडकीस आणली. आता पित्यावर कारवाई करावी, अशी मागणी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांकडे केली आहे..
महेश विठ्ठल जगताप याने त्याचे वडील विठ्ठल शिवराम जगताप यांच्या विरोधात तक्रार केली आहे. जगताप यांनी नोकरी मिळविण्यासाठी शाळा सोडल्याचा बनावट दाखला सादर करून स्वारगेट येथील पीएमपी डेपोमध्ये नोकरी मिळविल्याचे पीएमपीच्या स्वारगेट डेपो व्यवस्थापकाकडे केलेल्या तक्रारीत म्हटले आहे. महेशने दिलेल्या माहितीनुसार, जगताप हे पीएमपीच्या स्वारगेट डेपोमधील वर्कशॉममध्ये नोकरीस आहेत. जगताप यांनी महेश व त्याच्या आईपासून वेगळे राहत वेगळा संसार थाटला आहे. त्याबरोबरच वडिलोपार्जित जमिनीची विक्री केली. त्यांच्या संपत्तीमधून त्यांना बेदखल केले आहे. लहानपणापासून आईने काम करून मुलांना वाढविले. आता धरणग्रस्त म्हणून दौंडला जमीन मिळाली ती विकण्याचा घाट घातला. त्यामुळे महेश याने न्यायालयात धाव घेतली. एके दिवशी नोकरीच्या ठिकाणी वडिलांनी वारसदार म्हणून कोण लावले हे पाहण्यासाठी महेश याने माहिती अधिकाराखाली पीएमपीकडे अर्ज केला. त्यावेळी मिळालेल्या माहितीच्या वेळी जगताप यांनी शाळा सोडल्याचा बनावट दाखला सादर करून पीएमपीमध्ये नोकरी मिळविल्याचे दिसून आले. मूळ शाळा सोडल्याचा दाखला व बनावट दाखला या दोन दाखल्यांमध्ये मोठी तफावत असल्याचे आढळून आले.
जगताप यांच्या मूळ दाखल्यावर त्यांची जन्मतारीख १ जून १९५६ अशी असून शाळा सोडल्याची तारीख ३१ मे १९७५ अशी आहे. तर माहिती अधिकारामार्फत मिळालेल्या दाखल्यावर १ जून १९६२ असून शाळा सोडल्याची तारीख ३१ मे १९८२ अशी आहे. मूळ दाखल्यावर असलेल्या माहितीमध्ये आणि बनावट दाखल्यामध्ये सहा ठिकाणी फेरफार करण्यात आला असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे जगताप यांनी पीएमपीमध्ये शासकीय नोकरी मिळविताना बनावट दाखला तयार करून त्याचा वापर केला आणि शासनाची फसवणूक केली आहे. त्यामुळे त्यांच्या विरोधात पोलीस कारवाई करावी, अशी मागणी महेश जगताप याने पीएमपीच्या व्यवस्थापकांकडे केली आहे.