महाराष्ट्राच्या संस्कृतीचे भूषण असलेला गणेशोत्सव आणि दहीहंडी या उत्सवांना बळ मिळण्यासाठी ध्वनिवर्धकाच्या वापराला मुभा देण्याचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना द्यावेत. धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांना रात्री बारापर्यंत ध्वनिवर्धक वापरण्यासाठी मुभा दिल्यावर त्या दिवशी या सवलतीचा वापर झाला नाही तर, त्या दिवसाची सवलत ही अन्य कार्यक्रमासाठी दिली जावी. गुजरात सरकारने या नियमाचा अंतर्भाव केला असून महाराष्ट्र सरकारने त्याचे अनुकरण करीत राज्याच्या आदेशामध्ये या नियमाचा अंतर्भाव करावा.
भारतीय जनता पक्षाच्या आमदार माधुरी मिसाळ यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवून ही मागणी केली आहे. या संदर्भात लवकरच गणेशोत्सव मंडळाच्या पदाधिकाऱ्यांसह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
सर्वोच्च न्यायालयाने रात्री १० ते पहाटे ६ या वेळात ध्वनिवर्धकाच्या वापरावर आठ वर्षांपूर्वी मनाई केली आहे. मात्र, हा नियम शिथील करून स्थानिक धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी वर्षांतील १५ दिवसांसाठी रात्री १२ वाजेपर्यंत ध्वनिवर्धक वापरण्यास मुभा दिली आहे. राज्य सरकारने शिवजयंती, रमजान ईद, आंबेडकर जयंती, महाराष्ट्र दिन, लक्ष्मीपूजन, ख्रिसमस आणि ३१ डिसेंबर असे ७ दिवस, गणेशोत्सवामध्ये ४ दिवस आणि नवरात्रोत्सवामध्ये २ दिवस ही मुभा दिली आहे. उर्वरित २ दिवसांबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी स्थानिक परिस्थितीचा विचार करून निर्णय घ्यावेत, असे आदेश देण्यात आले आहेत.
पुणे-मुंबईमध्ये गणेशोत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांनी अविश्रांत मेहनत घेऊन सादर केलेले समाजप्रबोधनपर देखावे ध्वनिवर्धकावरील र्निबधांमुळे नागरिकांना पाहता येत नाहीत. त्यामुळे कार्यकर्त्यांचा हिरमोड होतो. पुण्यामध्ये दहीहंडीचा उत्सव हा रात्री उशिरापर्यंत सुरू असतो. ही परिस्थिती ध्यानात घेऊन गणेशोत्सव आणि दहीहंडीला रात्री १२ पर्यंत ध्वनिवर्धकासाठी परवानगी मिळावी अशी कार्यकर्त्यांची मागणी असते. जिल्हाधिकाऱ्यांना अधिकार दिल्यास कार्यकर्त्यांच्या कष्टाला न्याय मिळू शकेल, अशी मागणी माधुरी मिसाळ यांनी मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या पत्रात केली आहे.