महापालिकेत आपण विरोधी पक्ष आहोत हे लक्षात घेऊन पुणेकरांच्या प्रश्नांवर संघर्ष करण्याची भूमिका घेतली पाहिजे आणि प्रभावी विरोधी पक्षाची भूमिका आपण पार पाडली पाहिजे, अशी अपेक्षा भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष प्रा. विकास मठकरी यांनी बुधवारी बैठकीत व्यक्त केली.
प्रा. मठकरी यांना १४ जानेवारी रोजी अचानक उद्भवलेल्या तब्येतीच्या त्रासामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. गेल्या महिनाभरात पक्षाचे अनेक नेते, पदाधिकारी आणि मोठय़ा संख्यने येणाऱ्या कार्यकर्त्यांनी प्रा. मठकरी यांची भेट घेऊन त्यांना लवकर बरे व्हा अशा शुभेच्छा दिल्या. महिनाभरानंतर प्रा. मठकरी यांनी बुधवारी रुग्णालयातच शहराच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. नगरसेवक गणेश बीडकर, हेमंत रासने, श्रीनाथ भिमाले, योगेश टिळेकर, प्रा. मेधा कुलकर्णी, वर्षां तापकीर, तसेच संघटनमंत्री श्रीकांत भारतीय, राजेश पांडे, प्रा. श्रीपाद ढेकणे, जयंत भावे यांच्यासह प्रमुख पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.
शहरातील संघटनात्मक काम, नियमित बैठका, तसेच कार्यक्रम आदींबाबत प्रा. मठकरी यांनी बैठकीत चौकशी केली. तसेच आगामी काळातील कार्यक्रम, उपक्रम यासंबंधीही सूचना केल्या. गेला महिनाभरात भेटून गेलेल्या सर्वाविषयी त्यांनी यावेळी कृतज्ञताही व्यक्त केली. शहरात प्रभावी विरोधी पक्ष म्हणून आपण कर्तव्य पार पाडले पाहिजे, प्रसंगी संघर्ष केला पाहिजे, असे बैठकीतील पदाधिकाऱ्यांबरोबर चर्चा करताना प्रा. मठकरी यांनी सांगितले.