‘लोकसत्ता लोकांकिका’ स्पर्धेच्या पुणे विभागाची अंतिम फेरी मंगळवारी (१३ ऑक्टोबर) भरत नाटय़ मंदिर येथे रंगणार आहे. सहा एकांकिकांमध्ये चुरस असून, विभागीय अंतिम फेरीतील युवा रंगकर्मीचा कलाविष्कार अनुभवत त्यांना प्रोत्साहन देण्याची संधी पुणेकरांना देण्यात येणार असून, त्यासाठीच्या प्रवेशिका रविवारी (११ ऑक्टोबर) ‘लोकसत्ता’ कार्यालयामध्ये उपलब्ध होणार आहेत.
सॉफ्ट कॉर्नर प्रस्तुत आणि पृथ्वी एडिफिस यांच्या सहकार्याने होणाऱ्या ‘लोकसत्ता लोकांकिका’ या स्पर्धेची पुणे विभागाची प्राथमिक फेरी गेल्या रविवारी (४ ऑक्टोबर) जल्लोषात पार पडली. पुणे आणि परिसरातील २१ महाविद्यालयांच्या संघांनी या फेरीमध्ये आपला कलाविष्कार सादर केला. या फेरीतून इंटरनॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीची (आयआयआयटी) ‘आंधळे चष्मे’, बृहन महाराष्ट्र वाणिज्य महाविद्यालयाची (बीएमसीसी) ‘व्हाय शूड बॉइज हॅव ऑल द फन’, महाराष्ट्र इन्स्टिटय़ूटची (एमआयटी) ‘कश्ती’, सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअिरगची ‘रोहिणी’, फग्र्युसन महाविद्यालयाची ‘िपपरान’ आणि गरवारे कॉलेज ऑफ कॉमर्सची ‘जार ऑफ एल्पिस’ या सहा एकांकिकांची विभागीय अंतिम फेरीसाठी निवड झाली आहे.
भरत नाटय़ मंदिर येथे मंगळवारी दुपारी दोन वाजता विभागीय अंतिम फेरीतील सहा एकांकिकांचे सादरीकरण होणार आहे. या फेरीसाठी नाटय़क्षेत्रातील मान्यवरांबरोबर बसून, युवा रंगकर्मीचा कलाविष्कार अनुभवण्याची संधी पुणेकर रसिकांना उपलब्ध करून देण्यात आली आहे. युवा कलाकारांना प्रोत्साहन देण्यासाठी नाटय़प्रेमींनी आवर्जून उपस्थित राहावे, अशी अपेक्षा आहे. मात्र, त्यासाठी प्रवेशिका आवश्यक आहे. या प्रवेशिका रविवारी (११ ऑक्टोबर) संभाजी उद्यानासमोरील शिरोळे रस्त्यावरील ‘लोकसत्ता’ कार्यालयामध्ये (बँक ऑफ इंडियाच्या मागे) सकाळी दहा ते दुपारी एक या वेळात उपलब्ध होणार आहेत.