‘समृद्ध जीवन’चा सर्वेसर्वा महेश मोतेवार याला गुंतवणूक व फसवणुकीच्या प्रकरणात अटक झाल्यानंतर सीबीआयने घातलेल्या छाप्यांच्या दरम्यान मोतेवार याच्या पत्नीने चालकाकडे लपवून ठेवलेल्या चार किलो सोन्याच्या दागिन्यांपैकी तीन किलो दागिन्यांचा शोध पोलिसांनी लावला. लपवून ठेवलेले हे दागिने चोरीला गेले होते. चोरीच्या या प्रकरणात पाचजणांना पोलिसांनी अटक केली आहे. चोरीबाबत तक्रार न देण्याचे मोतेवारच्या पत्नीने चालकाला बजावले होते, अशी माहितीही या तपासात पुढे आली आहे. पोलीस उपायुक्त पी. आर. पाटील यांनी याबाबतची माहिती दिली.

नीलेश भाऊसाहेब कोळपे (वय ३१, रा. वाल्हेकरवाडी, चिंचवड), वाल्मिकी बिरा कोळपे (वय ३०) यांच्यासह चोरीचे सोने विकत घेणारे व्यंकटेश ऊर्फ पप्पू तुळशीदास दहीवाळ (वय ३२, रा. गणेश कॉलनी, थेरगाव), प्रदीप ऊर्फ बाळू येसू गायकवाड (वय ४५, रा. बलवडी, ता. खानापूर, जि. सांगली), भरत ज्ञानदेव पडळकर (वय ३७, रा. म्हसवड. ता. माण, जि. सातारा) यांना पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून ८८ लाख ४२ हजार रुपये किमतीचे तीन किलो सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहेत. मोतेवारच्या मोटारीचा चालक नरहरी देवराम घरत (रा. भालके कॉलनी, वाल्हेकरवाडी, चिंचवड) याची या प्रकरणात चिंचवड पोलिसांनी फिर्याद घेतली आहे.

वाकड येथे अ‍ॅमेझॉन कंपनीची १९ लाख रुपयांची रोकड लुटल्याप्रकरणी नीलेश व वाल्मिकी यांना पोलिसांनी पूर्वी अटक केली होती. त्यांच्याकडे तपास सुरू असताना त्यांनी मोतेवारचा मोटार चालक घरत याच्या घरातून चार किलो सोन्याचे दागिने लुटल्याचे उघड झाले. मात्र, या प्रकरणी गुन्हाच दाखल नसल्याचे समोर आले. पोलिसांनी तातडीने हालचाली करून सुरुवातीला एक किलो सोने जप्त केले. आरोपींची चौकशी करून आणखी दोन किलो सोने जप्त करण्यात आले. आरोपी हे घरत हा राहात असलेल्या परिसरातच राहात होते. त्याच्या घरी महागडय़ा मोटारीतून रात्री उशिरापर्यंत काहीजण येत होते. त्यामुळे घरत याच्याकडे काहीतरी मिळू शकते, हे हेरूनच आरोपींनी त्याच्या घरावर दरोडा टाकला होता. मात्र, मोतेवार याची पत्नी लीना मोतेवार यांच्या सांगण्यावरून त्याने याबाबत पोलिसांत तक्रार दिली नव्हती.

अतिरिक्त पोलीस आयुक्त सी. एच. वाकडे, उपायुक्त पी. आर. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक लक्ष्मण बोराटे, सहायक निरीक्षक नितीन भोयर, गणेश पाटील, अन्सार शेख, उपनिरीक्षक विलास पलांडे, प्रमोद वेताळ, संतोष बर्गे, अमित गायकवाड, संजय गवारे, गणेश काळे आदींच्या पथकाने ही कारवाई केली.