पिंपरी-चिंचवडमधील भाजपचे नगरसेवक तुषार हिंगे यांच्यावर निगडी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आर्थिक फसवणुकीची तक्रार दाखल केल्यानंतर हिंगे यांनी मारहाण केली, असा आरोप तक्रारदारांनी केला आहे. याप्रकरणी नगरसेवक तुषार हिंगे यांच्यासह २० जणांवर हत्येचा प्रयत्न आणि बेकायदा शस्त्र बाळगल्याच्या गुन्हा दाखल करण्यात आलाय. हा गुन्हा अवास्तव असल्याचं कारण पुढे करत पोलिसांनी लगेच अटक करता येणार नसल्याचं म्हटलं आहे.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, कालिदास गाडे आणि महेश गारोळे यांनी ३० सप्टेंबरला रवींद्र तळेकर यांच्या विरोधात आर्थिक फसवणुकीसंदर्भात यमुनानगर पोलिसांत तक्रार दाखल केली होती. ही तक्रार दाखल केल्याच्या कारणावरुन हिंगे आणि त्यांच्या समर्थकांनी दोघांना मारहाण केली. यात दोघे जखमी झाले होते. हा प्रकार घटल्यानंतर हिंगे यांच्या विरोधात पोलीस गुन्हा दाखल करुन घेत नाहीत, असा आरोप करत गारोळे आणि गाडे यांनी पोलीस ठाण्यासमोरच आंदोलन केले. त्यानंतर अखेर हिंगे यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.