पुण्याजवळील तळेगाव-चाकण रस्त्यावर खराबवाडीत येथील आरोग्य केंद्राजवळील सना इंटरप्रायजेस या कॉटन कंपनीला लागलेल्या आगीत पाच जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. ही आग सकाळी दहाच्या सुमारास लागली. आग लागल्याचे समजताच अग्निशामक दलाच्या पाच गाड्या त्वरीत घटनास्थळी रवाना झाला. अग्निशामक दलाच्या कर्मचाऱ्यांनी कंपनीतून पाच कर्मचाऱ्यांचे मृतदेह बाहेर काढल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. साडेतीन तासानंतर आग आटोक्यात आणण्यात अग्निशामक दलाला यश आले.

मृतांमध्ये चार महिला व एका पुरूषाचा समावेश असल्याचे पोलिसांनी सांगितले. मृतांची नावे अशी १) कल्पना शिरसाठ (वय २९), २) राधा ठाकूर (वय २६), ३) उज्वला सोनसळे (वय ३२), ४) कुसुम साखरकर (वय ३०), ५) रामदास राठोड (वय ५२). कंपनीत आणखी किती लोक अडकले आहेत याची माहिती समजू शकलेली नाही. परंतु कामगारांनी आणखी कर्मचारी आत असल्याची शक्यता व्यक्त केली आहे. मृतदेह ग्रामीण रूग्णालयात शवविच्छेदनासाठी नेले आहेत. या कंपनीत महिला कामगारांची संख्या मोठ्याप्रमाणात आहे. सकाळी आग लागल्याचे परिसरातील नागरिकांनी पोलिसांना कळवले. पोलिसांनी अग्निशामक दलाला याची माहिती देताच त्वरीत पाच अग्निशामक गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. आग विझविण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. कापसामुळे आग आटोक्यात आणण्यात अडचण आली. पुण्याहून अग्निशामक दलाच्या आणखी गाड्या मागवण्यात आल्या होत्या. आगीमुळे धुराचे लोट उठले होते. अद्याप आगीचे कारण समजू शकलेले नाही.