पुण्यातील टिंबर मार्केटमध्ये मंगळवारी पहाटे भीषण आग लागली. या आगीत मार्केटमधील दुकाने, गोदाम आणि ४० घरे जळून खाक झाली आहेत. आगीत सहा सिलिंडरचे स्फोटही झाल्याने परिस्थिती बिकट होती. पण अग्निशमन दलाच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न करत आगीवर नियंत्रण मिळवले.

टिंबर मार्केटमधील विजय वल्लभ शाळेमागील घरांना मंगळवारी पहाटे ५ वाजून १० मिनिटांनी भीषण आग लागली. अवघ्या काही क्षणातच  ही आग पसरत गेली. या आगीत वेफर्सचा कारखाना, टायरचे गोदाम आणि सुमारे ४० घरे जळून खाक झाली. आगीत सहा सिलिंडरचे स्फोट झाल्याने बिकट परिस्थिती निर्माण झाली होती. आगीचे वृत्त समजताच घटनास्थळी अग्निशमन दलाचे ११ बंब आणि ४ टँकर दाखल झाले. तासाभराच्या अथक प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात त्यांना यश आले. सुदैवाने आगीत कोणतीही जीवितहानी झालेली नसली तरी आर्थिक नुकसान मोठ्या प्रमाणात झाले आहे. आगीचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट आहे.