बांधकाम व्यावसायिकाला मारण्यासाठी सुपारी दिल्याचा संशय; पुण्यातील माजी नगरसेवकाची मुलगी ताब्यात

पिंपळे गुरव भागात बांधकाम व्यावसायिकावर दुचाकीस्वार हल्लेखोरांनी पिस्तुलातून गोळीबार केल्याची घटना शनिवारी सकाळी घडली. गोळीबारात बांधकाम व्यावसायिक जखमी झाला आहे. बांधकाम व्यावसायिकाने पोलिसांकडे दिलेल्या तक्रारीनंतर सांगवी पोलिसांकडून पुण्यातील माजी नगरसेवकाच्या मुलीला ताब्यात घेण्यात आले आहे.

योगेश शंकर शेलार (वय ४०, रा.सांगवी) असे गंभीर जखमी झालेल्या बांधकाम व्यावसायिकाचे नाव आहेत. त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. शेलार शनिवारी सकाळी अकराच्या सुमारास पिंपळे गुरव भागातील श्री तुळजाभवानी मंदिरात दर्शनासाठी गेले होते. शेलार यांनी मंदिराच्या बाहेर मोटार लावली होती. दर्शन घेऊन मोटारीच्या दिशेने निघालेल्या शेलार यांच्यावर दुचाकीस्वार हल्लेखोरांनी पिस्तुलातून गोळ्या झाडल्या. शेलार यांच्या पायात गोळी शिरल्याने ते जखमी झाले. दुचाकीस्वार हल्लेखोर पसार झाले. त्यानंतर शेलार यांना तातडीने औंध येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी घटनास्थळाची पाहणी केली. तेव्हा तेथे पुंगळी सापडली. शेलार यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आल्यानंतर त्यांच्या पायात शिरलेली गोळी काढण्यात आली. दरम्यान, शेलार यांनी पुण्यातील माजी नगरसेवकाच्या मुलीने हल्लेखोरांना सुपारी देऊन गोळीबार केल्याचा संशय पोलिसांना दिलेल्या तक्रारीत व्यक्त केला. सांगवी पोलिसांकडून तातडीने तपास सुरू करण्यात आला. माजी नगरसेवकाच्या मुलीला संशयावरून ताब्यात घेण्यात आले आहे. माजी नगरसेवकाने फेब्रुवारी २०१७ मध्ये झालेली पुणे महापालिकेची निवडणूक लढविली होती. त्या वेळी शेलार माजी नगरसेवकाच्या प्रचारासाठी पुण्यात आले होते. प्रचारात वाद झाल्याने माजी नगरसेवकाच्या मुलीने शेलारला प्रचारफेरीत सहभागी होण्यास मनाई केली होती. त्या वेळी शेलार आणि तिच्यात वाद झाले होते. निवडणुकीत नगरसेवक पराभूत झाला. शेलार याच्यामुळे वडिलांचा पराभव झाला, असा संशय माजी नगरसेवकाच्या मुलीला होता. या कारणावरून तिने हल्लेखोरांना सुपारी देऊन गोळीबार केल्याचा आरोप शेलार यांनी पोलिसांकडे दिलेल्या तक्रारीत केला आहे.

यासंदर्भात परिमंडल तीनचे पोलीस उपायुक्त गणेश शिंदे यांच्याशी संपर्क साधला असता या प्रकरणाचा तपास सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.