पिंपरी-चिंचवडमध्ये भरदिवसा एका व्यक्तीवर गोळ्या झाडण्यात आल्या. या गोळीबारात संतोष कुरावत नावाची व्यक्ती गंभीर जखमी झाला आहे. दुपारी साडेतीनच्या सुमारास ही घटना घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपरीमधील साधू वासवानी चौकातील ओम शिव या हॉटेलमध्ये घुसून चार अज्ञातांनी संतोष कुरावत यांच्यावर चार गोळ्या झाडल्या. यातील एक गोळी त्याच्या डोक्याला चाटून गेली तर दुसरी गोळी त्याच्या पोटात लागली. गंभीर जखमी झालेल्या संतोषवर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. घटनास्थळी पोलिसांना एक पिस्तूल आणि एक जिवंत काडतूस सापडलं असून ही घटना सीसीटीव्हीमध्ये देखील कैद झाली आहे. पूर्ववैमनस्यातून हा गोळीबार झाला असावा, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला असून सीसीटीव्हीच्या फुटेजच्या माध्यमातून आरोपींचा शोध सुरु आहे.

यापूर्वी १० सप्टेंबरला पिंपळे गुरवमध्ये डॉक्टर अमोल बीडकर यांच्यावर अज्ञाताने धारदार शस्त्राने वार केले होते. यानंतर दोन दिवसानंतर म्हणजे १२ सप्टेंबरला महिला पोलीस कॉन्स्टेबलच्या मुलाची हत्या झाली होती. या घटना ताज्या असताना पुन्हा गोळीबाराची घटना घडल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे.