मतदान केंद्रांवर मतदान करण्यासाठी तिष्ठत उभ्या राहिलेल्यांच्या रांगा आणि दुपार चढेल तसे अधिक कडक होत जाणारे ऊन असे चित्र गुरूवारी शहरात दिसणार आहे. मतदान करण्यासाठी आलेल्या नागरिकांना उन्हाचा त्रास झाल्यास त्यांना मदत मिळावी यासाठी पालिकेतर्फे मतदान केंद्रांवर प्रथमोपचार पेटय़ा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. पालिका प्रमुख एस. टी. परदेशी यांनी ही माहिती दिली. पालिकेची सर्व रुग्णालयेही या दिवशी पूर्णवेळ सुरू राहणार आहेत.
तीव्र उन्हात बराच वेळ वावरल्यानंतर उष्माघात, चक्कर येणे, उलटी होणे असा त्रास होण्याची शक्यता असते. हा त्रास टाळून ऊन बाधण्यावर वेळीच उपचार करता यावेत यासाठी मतदान केंद्रांवर प्रथमोपचार पेटय़ा ठेवल्याचे पालिकेने कळवले आहे. अंगदुखी, पोटदुखी, उलटय़ा, जुलाब व तापावरील प्राथमिक औषधे आणि बँडेज या गोष्टींचा या पेटीत समावेश आहे. शहरातील मतदान केंद्रांवर आरोग्य खात्यातर्फे एकूण २४७५ पेटय़ा पुरवण्यात आल्या आहेत.
मतदानाच्या दिवशी पालिकेचे सर्व दवाखाने व रुग्णालये पूर्ण वेळ सुरू राहणार आहेत. या ठिकाणी कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना मतदानासाठी कामातून २ तासांची सवलत देण्यात येणार असल्याचे पालिकेने सांगितले आहे.