रेल्वेच्या अनारक्षित डब्यांमध्ये जागा मिळविण्यासाठी एकाच वेळी उसळणारी गर्दी व त्यातून होणारी वादावादी लक्षात घेता सर्वसाधारण डब्यातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी पुणे रेल्वे स्थानकावर प्रथमच टोकन पद्धत सुरू करण्यात आली आहे. प्रथम येणाऱ्यास प्रथम प्रवेश या तत्त्वानुसार असणाऱ्या या टोकन पद्धतीमुळे अनेक समस्या दूर होतील, असे रेल्वेकडून सांगण्यात येत आहे. मात्र, टोकन देऊन प्रश्न सुटणार नसून, रेल्वे प्रशासनाने अनारक्षित डब्यांची संख्या वाढवून द्यावी व डब्यात जितकी जागा असेल, तितक्याच टोकनचे वितरण करावे, अशी मागणी करण्यात येत आहे.
पुण्यातून सुटणाऱ्या दरभंगा, गोरखपूर, बनारस, लखनौ, पटना, झेलम आदी गाडय़ांना नेहमीच मोठय़ा प्रमाणावर गर्दी असते. अनारक्षित डब्यामध्ये जागा मिळविण्यासाठी गाडी सुटण्यापूर्वी पाच ते सहा तास आधीच प्रवासी रांगा लावून बसलेले असतात. गाडीत चढल्यानंतर जागेवरून बहुतांश वेळाला वादाचे प्रसंग निर्माण होतात. अनेकदा प्रकरणे मारामारीवरही जातात. गाडीत जागा मिळवून देत प्रवाशांकडून पैसे उकळण्याचे उद्योगही काहींकडून सुरू करण्यात आलेले आहेत. त्यामुळे वेळेपूर्वी येऊनही अनेकांना जागा मिळत नाही. यावर पर्याय म्हणून प्रामुख्याने उत्तरेकडे जाणाऱ्या गाडय़ांमधील अनारक्षित डब्यांमधील प्रवाशांसाठी टोकन पद्धत सुरू करण्यात आली आहे. पुणे रेल्वेचे व्यवस्थापक बी. के. दादाभोय तसेच मिलिंद देऊस्कर, सुरक्षा आयुक्त डी. विकास यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये ही सुविधा सुरू करण्यात आली. या सुविधेनुसार अनारक्षित डब्यातून प्रवास करणाऱ्या प्रत्येक प्रवाशाला त्याच्या येण्याच्या वेळेनुसार टोकन दिले जाईल. त्यानंतर टोकनच्या क्रमांकानुसार त्यांना रांगेत उभे केले जाईल व त्यानुसारच प्रवाशांना अनारक्षित डब्यांमध्ये प्रवेश दिला जाईल. रेल्वे सुरक्षा दलाच्या माध्यमातून टोकनची पद्धत राबविण्यात येणार असून, या पद्धतीमुळे मध्येच घुसखोरी करणाऱ्या प्रवाशांवर आळा बसेल, असा विश्वास रेल्वेकडून व्यक्त करण्यात येत आहे.